आम.नितेश राणे यांचा खत कंपनीशी थेट संवाद
कणकवली
भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्स लिमिटेड या खत कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून सिंधुदुर्ग जिल्हात युरिया खताचा पुरवठा तातडीने करा अशा सूचना दिल्या आहेत. या सुचने नंतर कंपनीचे कोकण विभागीय अधिकारी श्री वराडकर यांनी येत्या चार दिवसात युरिया सह उर्वरित खतांचा पुरवठा मागणीप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक खरेदी विक्री संघाच्या केंद्रावर केला जाईल आणि युरिया खताची असलेली टंचाई दूर केले जाईल असा शब्द दिला आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना युरिया खताची भेडसावणारी समस्या येत्या चार दिवसात सुटणार असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक आणि कणकवली खरेदी-विक्री संघाचे चेअरमन विठ्ठल देसाई यांनी दिली.
खरीप हंगाम सुरू झाला असून या हंगामात शेतकऱ्यांना पहिला टप्प्यात युरिया खताची शेतीसाठी गरज असते. त्यानंतर सुफला किंवा कृषी उद्योग अशा मिश्र खतांची गरज भासते. सध्या युरिया चा साठा अपुरा प्राप्त झाल्यामुळे युरिया खताची टंचाई भासू लागली. शेतकऱ्यांची होणारी गैरसोय आमदार नितेश राणे यांचे लक्ष येताच त्यांनी राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्स या खत निर्मितीच्या कंपनीशी थेट संवाद साधला.किती दिवसात खताचा पुरवठा करणार हे विचारून घेतले. त्यानंतर कणकवली तालुक्यातील खरेदी-विक्री संघाला एक हजार मेट्रिक टन युरिया आणि दोनशे मेट्रिक टन सुफला चा पुरवठा करणे संदर्भातही सूचना दिल्या. तसेच अन्य तालुक्यातील खरेदी विक्री संघाच्या मागणीप्रमाणे त्या तालुक्यातील संघाच्या केंद्रांवर युरियाचा पुरवठा करावा.कोणतीही दिरंगाई करू नये अशा सूचना कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
त्यानंतर कंपनीचे उपविभागीय परिक्षेत्र अधिकारी वराडकर यांनी कणकवली तालुका खरेदी-विक्री संघाला संपर्क साधून चार दिवसात खताचा पुरवठा केला जाईल आणि शेतकऱ्यांची समस्या दूर केली जाईल असे सांगितले.त्याचप्रमाणे आरसीएफ कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आपण तातडीने खतपुरवठा करू असे सांगितले आहे. कणकवली शेतकरी संघाकडे राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर्स कंपनीकडून ३५० मेट्रिक टन युरिया आणि झुआरी कंपनीकडून १५० मेट्रिक टन युरिया खताचा पुरवठा झालेला आहे. उर्वरित मागणी चार दिवसात पूर्ण होणार आहे असे श्री विठ्ठल देसाई यांनी सांगितले.