जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच… लालित्य नक्षत्रवेल समूह सदस्य लेखक-कवी दीपक पटेकर यांची अप्रतिम स्फुटकाव्य रचना
वाटलं होतं मला…
कधीतरी समजतील तुला…
भावना माझ्या मनातल्या…!
हतबल झालेलं दुःख दिसेल तुला
शुष्क निस्तेज झालेल्या डोळ्यात…!
तू सारं जाणूनही निर्विकार राहिलीस…
मी मात्र माझी दुःख पापण्यांत मिटून घेतली…
पुन्हा कधीही तुला न दिसण्यासाठीच…!
खरंच वाटतं का गं तुला…
मिटल्या पापण्यांत दुःख दडून राहतात?
अगं वेडे…
मी हसताना माझ्या भरल्या डोळ्यात
चुरचुर होऊन वाहत होती ती दुःख…
तू आनंदाश्रू समजून हसून गेलीस…
अन्…
मी आवरत गेलो,
पालापाचोळा झालेली माझी असह्य दुःख, वेदना
जतन करून आयुष्यभर कुरवाळत बसण्यासाठीच…!
©[दीपि]
दीपक पटेकर, सावंतवाडी