You are currently viewing देवली काळेथर प्रशालेच्या इमारतीचे छप्पर कोसळले…

देवली काळेथर प्रशालेच्या इमारतीचे छप्पर कोसळले…

मालवणात पावसाची संततधार सुरू ; तालुक्यात अनेक ठिकाणी पडझड…

मालवण

शहरासह तालुक्यात गेले दोन दिवस पावसाची संततधार सुरू आहे. यात काही ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. तालुक्यातील पूर्ण प्राथमिक शाळा देवली काळेथर या प्रशालेच्या इमारतीचे छप्पर आज पावसात कोसळले. सुदैवाने शाळा बंद असल्याने दुर्घटना टळली.

गेल्यावर्षी तोक्ते वादळात प्रशालेच्या इमारतीच्या लाकडी छप्पराचा काही भाग कोसळला होता. मात्र त्याची दुरुस्ती अद्यापपर्यंत झाली नव्हती. त्याच पडझड झालेल्या छप्पराचा पुढचा भाग आज कोसळला. सुदैवाने शाळांचा सुटीचा कालावधी असल्याने शाळा बंद होती. त्यामुळे शाळेत शिक्षक, मुले कोणीही नव्हते असे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले.

दरम्यान याबाबत माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विजय यादव, पोलीस कर्मचारी सुभाष शिवगण, दिलीप खोत व तलाठी यांनी पडझडीची पाहणी केली. शाळा सुरू झाल्यानंतर मुलांची सुरक्षित व्यवस्था शाळेच्या कुठल्या वर्गखोल्यात करणार याची माहिती पोलिसांनी पाहणी दरम्यान घेतली. यावेळी स्थानिक रहिवाशी तथा ज्येष्ठ शिवसेना पदाधिकारी भाई गोवेकर, उपसरपंच भाऊ चव्हाण, भाई मयेकर, बाबू सारंग व अन्य उपस्थित होते.

शाळेच्या छप्पर दुरुस्तीसाठी भाई गोवेकर यांच्या मागणीनुसार खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून शासन निधी मंजूर करण्यात आला आहे. लवकरच छप्पर दुरुस्ती केली जाणार आहे. असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा