जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.राधिका भांडारकर यांचा अप्रतिम लेख
आधी प्रपंच करावा नेटका।
मग घ्यावे परमार्थ विवेका ।
येथे आळस करू नका।
विवेकी हो।
या संत रामदासांच्या ऊक्तीनुसार सर्वसामान्य,प्रपंचात गुंतलेल्या ,गृहस्थाश्रमी माणसासाठी अध्यात्म म्हणजे नक्की काय याचा विचार करताना अनेक प्रश्न माझ्या मनात ऊभे राहतात. अध्यात्म म्हणजे
वयाच्या ऊतारवयात निवृत्तीच्या मार्गावर
घेऊन जाणारं एक साधन असं मला वाटायचं.तरुणपणी कर्मयोग आणि म्हातारपणी भक्तीमार्ग ,आणि भक्ती मार्ग म्हणजेच अध्यात्म असा काहीतरी समज होता. अध्यात्म म्हणजे
धर्म ,कर्मकांडं,व्रतवैकल्य ,पोथ्यापुराणं
ईश्वराची ऊपासना .आणि हे सर्व
आयुष्य सरुन गेल्यानंतर करण्याच्या
गोष्टी आहेत ,असं वाटायचं.ते काहीसं
क्लीष्ट वाटायचं ,अनाकलनीय वाटायचं.
पण जसजशी बुद्धी विकसीत होत गेली ,अनुभव विश्व विस्तारत गेलं
तेव्हां कळत नकळत मनाच्या गाभार्यातून असं काही जाणवायला लागलं की अध्यात्माची एक निराळीच
व्याख्या समोर आली.अध्यात्म म्हणजे
भौतिकतेवर विजय मिळवण्यासाठी
केलेला अभ्यास,एक शास्र किंवा ग्रंथवाचन इतकेच नसून अध्यात्म ही
विचारधारा आहे.विचार, भावना आणि
कृती प्रणाली आहे.ती एक थेरेपी आहे. उपचार पद्धती आहे.तो एक उच्च संस्कार आहे .आणि या संस्काराची
रुजवात ही लहान वयातच व्हायला
हवी.
लहानपणी जेव्हा आजी रामायण महाभारतातील कथा सांगते,तेव्हां तिथूनच जडण घडणीच्या काळात
अध्यात्माच्या वाटेवर प्रवास सुरु होतो.
पण तेव्हां त्याची जाणीव नसते.मात्र
अध्यात्माचाच तो संस्कार असतो.एक
सत्संग असतो.चांगलं ऐकावं,चांगलं काय आणि वाइट काय याचं आकलन व्हावं,आणि जे जे चांगलं,खरं ,अस्सल
ते ते वागणुकीत उतरावं म्हणजे अध्यात्म. अध्यात्म म्हणजे मूळात कोणतीही धार्मिक गोष्ट नाही.अध्यात्म
म्हणजे आपलं कौटुंबिक आणि सामाजिक कर्तव्य पार पाडणं.आपल्या कामावर निष्ठा ठेवणं.
जेव्हा घरातील स्त्री ,आपल्या कुटुंबीयांसाठी स्वयंपाक बनवते तेव्हा ती तिचे मन त्यात ओतते.तेव्हांच ते पदार्थ रुचकर बनतात.आणि खाणार्यांनी दिलेली तृप्तीची ढेकर हा त्या स्त्रीचा आत्मानंद असतो.ही निर्भेळ निरपेक्ष आनंदाची भावना म्हणजेच
अध्यात्म!त्यासाठी निराळं काहीच करायची गरज नाही.सद्भाव,सेवाभाव ,कृतार्थभाव म्हणजे आध्यात्म!साधं,सोपं, सरळ आणि निर्मळ असणं,दिसणं आणि
वागणं म्हणजे अध्यात्म.
माझी मुलगी अमेरिकेहून बर्याच वर्षांनी सगळ्यांना भेटायला भारतात आली होती.नातेवाईकांनी तिला भरभरून भेटी दिल्या.जिच्या अंगाखांद्यावर ती वाढली, त्या माझ्याकडे काम करणार्या बाईनेही तिला भेट दिली. ओंजळभर हिरवीगार
गिलकी.(खानदेशात घोसाळ्याला गिलकी म्हणतात) देतांना म्हणाली.
“लई आवडते ना ह्यो भाजी.दाराशी बी लावलं.रोप वाढवलं. निगुतीनं.रोपाला म्हणावं,फुल गं बाई! म्होप फळं दे.माजी
बाय यायचीय्. तिला लई आवडते गिलकी.खावडवीन तिला.”
निर्मळ भावना. निर्मळ प्रेम!या अडाणी बाईनं कुठले ग्रंथ वाचले!
तिच्या वृत्तीत भिनलेली ही विमल भावना म्हणजेच अध्यात्म.
झाड फुलांनी आले बहरुन
तू न पाहिले डोळे ऊघडून
वर्षाकाठी पाउसधारा
तुला न दिसला त्यात इशारा
काय तुला ऊपयोग आंधळ्या
दीप असून उशाशी.
आध्यात्म म्हणजे निसर्गातलं सौंदर्य बघायला शिकणं.आणि निसर्गाचे नियम पाळणं.अध्यात्म म्हणजे तुज आहे तुजपाशी हे ओळखणं.आणि मृगजळाच्या पाठी न धावणं.
राधिका भांडारकर पुणे