कुडाळ :
वेताळ-बांबर्डे भोगले वाडी ते पावशी मिटक्याचे वाडी या रस्त्याचे काम गेल्या वर्षभरापासून अतिशय संथ गतीने सुरू आहे. पंतप्रधान सडक योजनेतून अंतर्गत हे काम चालू आहे. स्थानिक लोकांनी अनेक वेळा या विरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला परंतु सत्ताधारी नेत्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून हे सगळे प्रयत्न हाणून पाडले होते.
ठेकेदाराचा दुर्लक्ष आणि विभागाच्या अधिकार्यांचा हेळसांड यामुळे गेल्या काही महिन्यापासून या रस्त्याचे काम पूर्णतः ठप्प होते. अखेर गेल्या काही दिवसापूर्वी या भागातील सर्व ग्रामस्थांनी एकत्रित भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष दादा साईल, सरचिटणीस देवेंद्र सामंत, सरपंच नागेश आईर, केंद्रप्रमुख भास्कर गावडे, माजी सरपंच बाबली बांबर्डेकर, अवधूत सामंत, अरविंद बांबर्डेकर, भूषण बांबर्डेकर आणि कार्यकर्ते यांच्या कानावर ही गोष्ट घातली. त्यानंतर या पदाधिकाऱ्यांनी संबंधित कामाला भेट देत या कामाचे ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांची चांगलीच कानउघडणी केली. या रस्त्याच्या काही भागात नुसतीच खडी पसरवून ठेवण्यात आली होती. त्यामुळे या ठिकाणी मोटर सायकल घसरून अपघात देखील झालेले आहेत. त्यामुळे तत्काळ या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण करून द्यावे अशी मागणी भाजपच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केली होती.
भाजपच्या या दणक्यानंतर संबंधित विभागाला जाग येत त्यांनी अखेर काल या रस्त्यावर डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात केल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. निदान आता पावसामध्ये या रस्त्यावरून चालले आम्हाला सुसह्य होणार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आणि भारतीय जनता पार्टीने दाखवलेल्या तत्परतेबद्दल आभार मानले आहेत.