ओरोस :
जून ते ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यात जोरदार पाऊस असतो. त्यामुळे त्याचा मतदानावर परिणाम होणार आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा खरेदी – विक्री संघ व जिल्ह्यातील आठही तालुका खरेदी-विक्री संघ यांच्या पंचवार्षिक निवडणुका पुढे ढकलाव्या. परिणामी सप्टेंबर २०२२ नंतर या निवडणुका घेण्यात याव्यात, अशी लेखी मागणी राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केली आहे.
मंत्री पाटील यांना दिलेल्या पत्रात बँक अध्यक्ष दळवी यांनी, सिंधुदुर्ग जिल्हयामधील जिल्हा संघ व आठही तालुका सह.खरेदी विक्री संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीची कार्यवाही सुरू झालेली असून, मतदारांच्या प्राथमिक याद्या बनविण्यात येत आहेत. या निवडणूका जून, जुलै २०२२ मध्ये होण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये सरासरी ३५०० मि.मि.एवढा पाऊस होतो. जून, जुलै व ऑगस्टमध्ये पावसाचे प्रमाण हे जास्त असते. त्यामुळे जुन ते ऑगस्ट मध्ये निवडणूका झाल्यास त्याचा विपरीत परिणाम मतदानावर होण्याची शक्यता आहे. तसेच संघांचे सभासद हे हजारांच्या पटीत असून, बहुतांश सभासद हे ग्रामिण भागातील आहेत.
त्यांना २० ते २५ कि.मी. अंतरावरून मतदान केंद्रावर यावे लागणार आहे व पावसाळी हंगामात ते अडचणीचे ठरणारे आहे. शासनाने जिल्हा परिषद तसेच पंचायत समित्यांच्या निवडणूकांबाबतीत कोकण विभागासाठी पावसाळी हंगाम वगळून निवडणूका घेण्याचे धोरण ठेवलेले आहे. याच धर्तीवर या जिल्हयातील या सहकारी संस्थांच्या निवडणूका सप्टेंबर २०२२ नंतर घेण्यात याव्यात. जेणेकरून या पावसाळी हंगामाचा निवडणूकीत अडथळा न येता सहकारी संस्थांच्या निवडणूका सुरळीतपणे पार पडतील अशी आमची धारणा आहे . तरी याबाबत सहानुभूतीपूर्वक विचार होवून , सहकारी संस्थांच्या निवडणूका सप्टेंबर २०२२ नंतर घेण्याची कार्यवाही व्हावी, अशी मागणी केली आहे.