वैभववाडी
महाराष्ट्राच्या लाल मातीत अठरापगड जातींना घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. शेकडो वर्षे गुलामगिरीत असलेल्या समाजाला मुक्त करून खऱ्या अर्थाने रयतेचे राज्य निर्माण केले. तत्कालीन परंपरावादी विचारांना मुठमाती देऊन पुरोगामी विचारांची मुहूर्तमेढ रोवली. शिवस्वराज्य दिन साजरा करण्याबरोबरच
छत्रपतींचे पुरोगामी शिवविचार आचरण्याची गरज आहे असे प्रतिपादन प्रा.श्री.एस.एन. पाटील यांनी केले.
महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना आणि इतिहास विभाग आयोजित दुसरा शिवस्वराज्य दिन कार्यक्रम संस्थेचे स्थानिक समिती अध्यक्ष श्री.सज्जनकाका रावराणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर प्रमुख वक्ते प्रा.श्री. एस. एन.पाटील, एन.एस.एस. कार्यक्रम अधिकारी प्रा.सचिन भास्कर, प्रा.आर.बी.पाटील, डॉ.केशव पाखरे व प्रा.पी.एम.ढेरे उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाने जून २०२१ मध्ये परिपत्रक काढून दि.६ जून ‘शिवराज्याभिषेक दिन’ हा ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून साजरा करण्याबाबत कळविले आहे.
वैभववाडी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दुसरा शिवस्वराज्य दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी प्रा.पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले हिंदवी स्वराज्य, स्वराज्याचे स्वरूप, व्याप्ती, शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांची माहिती दिली. ६ जून,१६७४ रोजी रायगडावर संपन्न झालेला राज्याभिषेक सोहळा ही एक क्रांतिकारी घटना असून त्यानंतर हिंदवी स्वराज्याला समाजमान्यता आणि राजमान्यता प्राप्त झाली.
तत्कालीन समाजामध्ये असणाऱ्या रुढी-परंपरां व विचारांना मूठमाती देऊन छत्रपती शिवाजी राजांनी पुरोगामी विचारांची उभारणी केली. छत्रपतींचे शिवविचार आचरणात आणण्याची गरज आहे असे प्रा.एस.एन.पाटील यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदी स्वराज्य स्थापन करून खऱ्या अर्थाने रयतेचे राज्य निर्माण केले. त्या शिवाजी महाराजांचा आदर्श आपण सर्वांनी डोळ्यासमोर ठेवला पाहिजे असे अध्यक्षीय भाषणात श्री. सज्जनकाका रावराणे यांनी सांगितले.
सुरुवातीला छ.शिवाजी महाराज प्रतिमापूजन व दिप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर महाविद्यालयीन विद्यार्थ्यीनींनी जय जय महाराष्ट्र माझा हे गीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.सचिन भास्कर यांनी केले तर प्रा.आर.बी.पाटील यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.