सावंतवाडी :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाविद्यालयीन शिक्षणाच्या सर्व सोयीसुविधा असलेलं पूर्वीपासूनचे एकमेव शहर म्हणजे सावंतवाडी. परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यात उच्च शिक्षणाच्या सर्वसोईनी युक्त अशा सुविधा मात्र नव्हत्या. दहावी बारावी नंतर काय? असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडायचा. अशावेळी पैसे असणारे लोक मुंबई, पुणे, कोल्हापूर, गोवा अशा ठिकाणी हॉस्टेल वगैरे सुविधा पाहून मुलांना पाठवायचे. परंतु सर्वसामान्य कुटुंबास ते परवडत नव्हतं. अशा सर्वसामान्य मुलांना आधारवड उभा केला तो सावंतवाडीतच शिकून मोठे झालेले अच्युत भोसले यांनी भोसले नॉलेज सिटीच्या माध्यमातून…!
अच्युत भोसले यांनी जिल्ह्यातील मुलांना इंजिनिअरिंग, फार्मसी शिक्षणासाठी बाहेरगावी जावे लागते, बरीच मुले बाहेरगावी जाणे परवडत नसल्याने शिक्षणापासून वंचित राहतात म्हणून सावंतवाडीत इंजिनिअरिंगचे शिक्षण सुरू करण्याचे ठरविले. सावंतवाडी शहरात मोठी जागा उपलब्ध नसल्याने अनेक अडचणींवर मात करत चराठे गावात त्यांनी काही एकर जागा घेत भोसले पॉलिटेक्निकचा पाया रचला.
आपल्या अथक प्रयत्नांनी चराठे येथे निसर्गरम्य जागेत शून्यातून विश्व निर्माण करत भोसले पॉलिटेक्निकची भव्यदिव्य वास्तू उभारली. पॉलिटेक्निक साठी लागणाऱ्या रीतसर परवानग्या घेऊन सावंतवाडीत अच्युत भोसलेंनी सर्वसामान्य मुलांसाठी इंजिनिअरिंगचे दालन खुले केले. भोसले पॉलिटेक्निक मध्ये मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्टिकल्स, कॉम्प्युटर असे ट्रेड आहेत. दरवर्षी शेकडो मुले इंजिनिअरिंग डिप्लोमा घेऊन बाहेर पडतात आणि आपल्या पायावर उभी राहतात. उच्च शिक्षणासाठीचा पायाच अच्युत भोसलेंनी सावंतवाडीत रचला आहे. मुलांना ये जा करण्यासाठी बसची सोय केली आहे, भव्य लायब्ररी, प्रयोगशाळा, कॅन्टीन, भव्य क्रीडांगण, मुलामुलींसाठी कॉलेजमध्ये हॉस्टेल सुविधा सुद्धा केल्या आहेत.
इंजिनिअरिंग शिक्षण सुरू करून न थांबता त्यांनी मुलांना जिल्ह्यात चांगले फार्मसीचे शिक्षण उपलब्ध नसल्याने आपल्या प्रीमायसिस मध्ये डी. फार्म व बी.फार्म कॉलेज सुरू केलं. जिल्ह्याबाहेर जाऊन महागडे शिक्षण घेणाऱ्या मुलांना जिल्ह्यातच फार्मसी कॉलेजची सुविधा निर्माण केली. त्यामुळे दरवर्षी कित्येक मुलांना फार्मसीचे शिक्षण घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी नोकऱ्या व स्वतःचे उद्योग सुरू करता आले आहेत. गोवा, मुंबई येथे फार्मसी केलेल्या मुलांना नोकरीच्या अनेक सुविधा आहेत.
सावंतवाडीत इंग्रजी माध्यमाच्या काही शाळा आहेत, परंतु सर्व सोयींनी युक्त अशी इंटरनॅशनल दर्जाची शाळा असावी अशी त्यांची इच्छा होती. त्यांनी प्राथमिक शिक्षणासाठी इंटरनॅशनल स्कूल सुरू केले. त्याला सिबीएससी बोर्डाची मान्यताही मिळाली आहे. त्यामुळे अनेक मुलांना उत्तम दर्जाचे शिक्षण मिळण्याची सोय झाली. तसेच मुलांना शाळेत ने आण करण्यासाठी स्कूल बसची सोय सुद्धा केली.
अच्युत भोसले यांनी लावलेला हा वटवृक्ष नऊ वर्षांचा झाला असून बराच पसरलेला आहे. या वटवृक्षाच्या छायेत शेकडो लोकांना रोजगार निर्माण झाला आहे. अनेक उच्चशिक्षित शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, शिपाई, वाचमन, वाहन चालक, माळी, अशा अनेक पदांवर सावंतवाडीच्या आजूबाजूच्या लोकांना नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. नवनवीन इमारतींमुळे अनेक कुशल अकुशल कामगारांना सुद्दा रोजगार उपलब्ध झाला आहे.असा हा शिक्षणाचा महामेरू उभारलेल्या संस्थेचा आज नववा वर्धापनदिन….
*उत्तरोत्तर भोसले नॉलेज सिटीची अशीच प्रगती होत राहो…याच संवाद मीडियाच्या शुभेच्छा…*