जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी हेमंत कुलकर्णी यांची अप्रतिम काव्यरचना
मी मानव मोठा प्राणी
मज प्रज्ञा बुद्धी वाणी
सृष्टीच्या आरंभाते
ऋण निसर्गाचेच मानी
मग माझ्या सोयी साठी
कधि वृक्षतोड मी केली
गिरि कंदर पादाक्रांते
भूमी ला वेठिस धरली
अडवून प्रवाही सरिता
खोदल्या विहीरी ताली
भूगर्भजलाचा साठा
संपविता प्रगती झाली
विज्ञानाची ती महती
जरि गातो दिवसा रात्री
श्रेष्ठ निसर्गाहुन हो मी
असण्याची आहे खात्री
शिखरावर समृद्धीच्या
मज चिंता पर्यावरणी
र्हासाते कारण होई
कुरघोडी निसर्ग करणी
आभाळ फाटल्यावरती
ठिगळे जोडण्यास धावे
तुटपुंजी धडपड दावी
उपकारांच्या या भावे
मी अजूनहि आत्ममग्नी
घेतो झोपेच्या सोंगा
साजरे दिवस प्रतिवर्षी
करि कर्तव्याच्या ढोंगा
—हेमंत श्रीपाद कुलकर्णी,
मुलुंड, मुंबई.