साथरोगांचा मुकाबला करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
पावसाळा म्हटल की हिरवाईने नटलेले डोंगर आणि बहरलेली शिवार नजरे समोर येतात. वातावरणामध्ये पावसाच्या आगमनामुळे एक वेगळेच चैतन्य आणि अल्हाददायकपणा येतो. पण, त्याचबरोबर पावसाळा घेऊन येतो ते जलजन्य आजार आणि साथरोग. पावसाळ्यात आपल्या जिल्ह्यात लेप्टोस्पायरोसीस, अतिसार, मलेरिया, डेंग्यू हे आजार आढळून येतात. तसेच दूषित पाण्यामुळे हगवण, गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ, विषमज्वर यांची लागणही होऊ शकते. यासाठी पाणी उकळून शुद्धकरून पिणे आणि आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे.
पावसाळ्याच्या दिवसात आरोग्याची काळजी घ्यावी म्हणजे काय ?
सर्वात महत्वाचे म्हणजे पावसाळा सुरू झाल्यानंतर पाणी उकळून थंड केलेले किंवा ब्लिचिंग पावडरने निर्जंतुक केलेले पाणी प्यावे. नेहमी ताजे व गरम अन्न खावे. फळे व भाजीपाला नेहमी भरपूर पाण्याने स्वच्छ धुवून नंतरच त्याचा वापर करावा. उघड्यावरील खाद्य पदार्थ खाणे टाळावे. घर व घराचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवावा. केर कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कचराकुंडी किंवा खतखड्याचा वापर करावा. घरा शेजारी व परिसरात सांडपाणी साचू देऊ नये. आपले घरी, वाडी, गावात हगवण, अतिसार, गॅस्ट्रो, विषमज्वर, कावीळ या रोगाचे रूग्ण आढळल्यास त्याची माहिती तातडीने नजीकच्या आरोग्य कर्मचाऱ्यास किंवा केंद्रास द्यावी. या आजारांची लक्षणे आढळल्यास जिल्ह्यातील आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय येथे जाऊन उपचार घ्यावेत. गावात नळ पाणी पुरवठा योजनेच्या पाईपलाईनमध्ये गळती असल्यास ती ग्रामपंचायतीच्या सहकार्याने तातडीने दुरुस्त करुन घ्यावी.
लेप्टोस्पायरोसीस, मलेरीया, डेंग्यू सारख्या आजारांबाबत पुढीलप्रमाणे काळजी घ्यावी. आपले घरात अगर शेजारी तिव्र ताप, अंगदुखी, थंडी वाजणे, तिव्र स्नायुवेदना, लघवी पिवळी होणे अशा लक्षणांचा रुग्ण असल्यास त्वरीत नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उप जिल्हा रुग्णालय तसेच जिल्हा रुग्णालय येथे उपचार घेण्यास प्रवृत्त करावे. बऱ्याचवेळा रुग्णांची लक्षणे ही किरकोळ स्वरुपाची व न समजुन येणारी असतात. त्यामुळे किरकोळ ताप असल्यास अंगावर तोलु नये. उपचारासाठी त्वरीत प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करावे.
ज्या व्यक्तींच्या हाता-पायांवर जखम किंवा खरचलेले असल्यात त्यांनी दुषित पाणी, दुषित माती, तसेच साचलेल्या पाणी यांचा संपर्क टाळावा, असा संपर्क टाळणे शक्य नसल्यास रबरी बुट, हातमोजे यांच्या वापर करावा. जनावरांच्या मलमूत्राशी सरळ संपर्क टाळावा. भात शेतीच्या हंगामात काम करणाऱ्या व्यक्तींनी अंगावर जखम असल्यास जखमेला बॅन्डेज करावे. शेतात भात कापणी करणाऱ्या व्यक्तींनी शक्य असल्यास हातमोजे व रबरी बूट वापरावे. पाळीव प्राणी मांजर, कुत्रा यांच्याशी जवळीकता टाळावी. घरातील व घराशेजारील परिसर स्वच्छ ठेवावा. उंदिर, घुशी यांचा नायनाट करावा. रुग्णांनी औषधोपचार नियमित व वेळेवर घ्यावा.
पावसाळ्याच्या काळात येणाऱ्या साथरोगांवर नियंत्रणासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी दिली आहे. जिल्हास्तरावर दोन व तालुकास्तरावर एक अशा एकूण 10 वैद्यकीय मदत पथकांची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हास्तरावर व प्राथमिक आरोग्य केंद्रात नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. खाजगी रुग्णालये व रुग्णवाहिका यांची यादीही अद्ययावत तयार करण्यात आली आहे. जोखीमग्रस्त गावांची निवड करून त्यांची यादी तयार केली आहे. औषधसाठा पुरशा प्रमाणात उपलब्ध ठेवण्यात आला आहे. प्रा.आ. केंद्रस्तरावर औषध किटची तयारी करण्यात आली आहे.
लेप्टोस्पायरोसीस, मलेरिया सारख्या आजारांचे निदान रक्त आणि लघवी तपासणीकरुन करता येते. जिल्ह्यात सर्व उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय येथे अशा तपासणीची सोय करण्यात आली आहे. तसेच पूरग्रस्त गावातील व संपर्क तुटणाऱ्या गावातील गर्भवती महिलांना त्यांच्या ईडीडी नुसार 4 ते 5 दिवस अगोदर दवाखान्यात दाखल तरुन घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. खलिपे यांनी दिली आहे.
आरोग्य यंत्रणा सज्ज आहेच तसेच औषधे व उपचारांची सोय करण्यात आली आहे. तरीही आपले आरोग्य सांभाळणे हे आपल्या हाती आहे. त्यादृष्टीने नागरिकांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून आपल्या आरोग्याची काळजी आपणच करावी. कारण उपचारा पेक्षा प्रतिबंध
हेमंतकुमार चव्हाण,
माहिती सहाय्यक,
जिल्हा माहिती कार्यालय, सिंधुदुर्ग.