ग्राहक पंचायत महाराष्ट्रची विभागीय ग्राहक प्रबोधन कार्यशाळा संपन्न…!
कणकवली
धावपळीच्या जीवनशैलीमुळे ग्राहक फसवला जातो आणि याकरता ग्राहकांचे प्रबोधन होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन कणकवलीच्या प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी केले. ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या एक दिवसीय कोकण विभागीय ग्राहक प्रबोधन कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी त्या उदघाटक म्हणून बोलत होत्या . कणकवली येथे आयोजित या विभागीय ग्राहक प्रबोधन कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे राज्य अध्यक्ष डॉक्टर विजय लाड होते. त्यांच्यासह कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे, कणकवली तहसीलदार रमेश पवार , ग्राहक पंचायतचे राज्य सचिव अरुण वाघमारे , राज्य संघटक सर्जेराव जाधव, ग्राहक मंच सिंधुदुर्गचे माजी अध्यक्ष कमलाकांत कुबल , कणकवली पोलिस निरीक्षक राजेंद्र हुलावले , ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे कणकवली तालुका अध्यक्ष नामदेव जाधव आदी मान्यवर उपस्थित होते .
ग्राहक म्हणून अन्याय होत असताना सर्वसामान्य ग्राहक तक्रार करून काय होणार ? अशी मानसिकता बाळगतो आणि याकरीता प्रबोधन होणे तसेच ग्राहकाला सजग करणे हे कार्य या कार्यशाळेच्या माध्यमातून होणार आहे . फक्त ग्राहकाने सक्षमता दाखवीत मानसिकता बदलली तर निकोप समाजाभिमुख ग्राहक चळवळीला बळ मिळेल असा ठाम विश्वास राजमाने यांनी पुढे व्यक्त केला .
या ग्राहक प्रबोधन कार्यशाळेमध्ये राज्याचे सचिव अरुण वाघमारे , वीज महावितरणचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते , ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे राज्य संघटक सर्जेराव जाधव तसेच जिल्हा ग्राहक मंचचे माजी अध्यक्ष कमलाकांत कुबल आणि कोकण विभागाचे अध्यक्ष एस एन पाटील यांनी ग्राहक संबंधी विविध विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.