“आम्ही वेंगुर्लेकर” शिष्टमंडळाची जिल्हा पोलिस अधीक्षकां बरोबर चर्चेअंती मागणी
अंमली पदार्थ विरोधी जिल्हास्तरीय कार्यकारी समितीची पुढील शासकीय सभा वेंगुर्ल्यात घेणार : दाभाडे
वेंगुर्ला
वेंगुर्ले तालुक्यात आता अंमली पदार्थांची राजरोजसपणे होणारी तस्करी व वाहतुकीस होऊ लागली आहे. यामध्ये युवा पिढी बरबाद होत आहे, याला वेळीच आळा घालावा, शहरातील काही ठराविक भागात हे लोण पसरत आहे. त्यामुळे यावर पोलिसांनी तातडीने कारवाई करावी अशी मागणी वेंगुर्ल्यातील आम्ही वेंगुर्लेकर शिष्टमंडळाने जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांची ओरोस येथे भेट घेऊन चर्चा केली आणि त्यानंतर लेखी निवेदनाद्वार केली आहे.
यावेळी दाभाडे यांनी सविस्तर चर्चा करून आम्ही योग्य ती कारवाई करू असे आश्वासन दिले. तसेच लवकरच वेंगुर्ले येथे याबाबत बैठक आयोजित करून नागरिकांचे व पालकांचे प्रबोधन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
“आम्ही वेंगुर्लेकर” तर्फे नंदन वेंगुर्लेकर, ईर्षाद शेख, अभिषेक वेंगुर्लेकर, पि.के. कुबल, दाजी नाईक, जया चुडनाईक, अर्पिता मुंबरकर आदी या शिष्टमंडळात सहभागी झाले होते. पर्यटनदृष्ट्या सामाजिक व आर्थिक विकास होताना परराज्यातून होणारी चोरटी दारु वाहतुक, अंमली पदार्थांची राजरोसपणे होणारी तस्करी, शहर तसेच नाक्यानाक्यावर काहीवेळा होणारी खुलेआम, चोरीछुपे खरेदी-विक्री, अल्पवयीन मुलामुलांना लागलेला मादक द्रव्याच्या अतिसेवनाचा नाद, रात्रीच्यावेळी होणारी अंमली पदार्थांची वाहतुक यासारखे अनेक प्रश्न यावेळी चर्चिले गेले. तसेच संभाव्य अशा ठिकाणांची यादिही पोलिसांना यावेळी देण्यात आली.
फक्त वेंगुर्ला शहर व तालुक्याचा विचार करता सध्याची तरुण पिढी आई-वडिलांचे संस्कार पायदळी तुडवून अंमली पदार्थांच्या अतिसेवनाकडे वळलेली असून या वाममार्गामुळे त्यांचे भविष्य अंधःकारमय दिशेने जात असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. त्यामुळे पोलिस विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष घालून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी नूतन पोलीस निरीक्षक यांना शोध घेऊन तात्काळ गुन्हा दाखल करण्याची आपण सूचना केली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच NCB, गोवा यांच्या विशेष टीम बरोबर चर्चा करून सागरी किनारपट्टी व महाराष्ट्र/गोवा सीमारेषेवर गस्त वाढवण्यावर भर राहील असेही दाभाडे यांनी सांगितले. या चर्चेदरम्यान विभागीय पोलीस अधिकारी रोहिणी साळुंके याही उपस्थित होत्या.