मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांना निवेदन…
सिंधुदुर्गनगरी
कणकवली तालुक्यातील तोंडवली-बावशी ग्राम पंचायत विरोधात येथील पुंडलिक आत्माराम मर्ये व ज्ञानेश्वर विठ्ठल मर्ये हे कुटुंबासह ६ जून सकाळी १०.३० वाजल्या पासून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार आहेत.
याबाबतचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांना दिलेल्या निवेदनात मर्ये यांनी, तोंडवली – बावशी ग्राम पंचायतीने नमुना नंबर २३ ला रस्ता नोंद करताना मयत माणसांचे संमतीपत्र तयार केले आहे. खोट्या पद्धतीने नमुना नंबर २३ ला नोंद करीत रस्ता करून घेतला आहे. याबाबत आम्ही दिलेल्या तक्रारीची चौकशी जाणीव पूर्वक ग्रामसेवक व ग्रामपंचायतने केलेली नाही. संबंधित जमिनी बाबत न्यायालयात वाद सुरू असताना त्याकडे दुर्लक्ष केला आहे. गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केलेली असताना व या स्तरावरून ग्राम पंचायतीने संबंधितांवर कारवाई करावी, असे आदेश असताना त्याला केराची टोपली दाखविली आहे.
या अनुषंगाने उपोषण केले असता गटविकास अधिकारी यांनी मध्यस्थी करीत २३ नंबरला झालेली नोंद रद्द करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे आम्ही उपोषण थांबविले होते. त्यामुळे आपण ही नोंद रद्द होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण करणार असल्याचे नमूद केले आहे. तसेच खोटे संमतीपत्र तयार करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल व्हावा. न्यायालयीन वाद सुरू असल्याने ग्रामसेवक यांनी २३ नंबरमध्ये ढवळाढवळ करू नये. तसेच रस्त्याचे काम करू नये. ग्रामसेवक यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी. सरपंच यांनाही पदच्युत करावे, अशा मागण्या यात करण्यात आल्या आहेत.