१ लाखाचा निधी मंजूर ; स्थानिक नागरिकांसह मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांचा पाठपुरावा
मालवण
देऊळवाडा पूल परिसरात माती व गाळ मोठया प्रमाणात साचला आहे. त्यामुळे पावसाळ्यामध्ये अतिवृष्टी मध्ये रस्त्यावर पाणी साचून आजूबाजूच्या घरांना धोका निर्माण होतो तसेच गणेश चतुर्थीच्यावेळी गणेश विसर्जन करताना अनेक गणपतीचे विसर्जन संपूर्णतः होत नाही. याकडे देऊळवाडा परिसरातील नागरिकांनी दोन महिन्यापूर्वी मालवण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे तसेच जिल्हाधिकारी यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे यांनी येथील गाळ उपसा करण्यासाठी १ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हे काम आजपासून सुरू होणार आहे. याबद्दल देऊळवाडा पुल परिसरातील नागरिकांनी मुख्याधिकारी व न. प. प्रशासनातील अवेक्षक सुधाकर पाटकर, अभियंता सोनाली हळदणकर यांचे आभार मानले आहेत. या कामासाठी मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी प्रशासन स्तरावर पाठपुरावा केला.
अलीकडे सातत्याने पावसाळ्यात येथील पाण्यामुळे होणाऱ्या त्रासा बाबत स्थानिकांनी मुख्याधिकाऱ्यांचे लक्ष वेधले होते. आपण आपल्या अधिकाराखाली गणपती विसर्जन भागातील पुलाखालील साचलेला गाळ काढण्यासाठी प्रयत्न करावे यासाठी यावेळी निवेदन दिले होते. या निवेदनाचा यशस्वी पाठपुरावा मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी केला त्याची दखल घेत या कामाला मान्यता देण्यात आली आहे. यावेळी बोलताना मनसेच्या अमित इब्रामपूरकर यांनी म्हटले आहे की गेली पंचवीस वर्ष या भागातून निवडून दिलेले नगरसेवक देऊळवाडा पूलातील गाळ व माती उपसा करण्याचे काम करू शकले नाहीत. पण जागरूक नागरिकांनी एका निवेदनाद्वारे मुख्याधिकार्यांचे लक्ष वेधले आणि मुख्याधिकारी यांनी तात्काळ त्याची दखल घेऊन काम मार्गी लावले. त्यामुळे आता निवडून दिलेल्या देऊळवाडा प्रभागातील सर्व नगरसेवकांनी आत्मपरीक्षण करावे. नागरिकांमध्ये एकी असेल तर नगरसेवकांशिवाय कामे मार्गी लागतात हे लक्षात ठेवावे, असे श्री. इब्रामपूरकर यांनी म्हटले आहे.