कुडाळ
गेले पाच ते सहा महिने सिंधुदुर्गातील रिक्षा व्यवसाय पुर्णपणे धोक्यात आला आहे. हातावर पोट असणाऱ्या रिक्षा व्यवसायीकाना आज मदतीची गरज आहे. अशा आशयाचे निवेदन कुडाळ रिक्षा मालक संघटनेचे अध्यक्ष अविनाश पाटील यांनी पालकमंत्री उदय सामंत यांना दिले आहे.
शासनाने सिंधुदुर्ग जिल्हयासाठी दिलेला निधी लोककल्याणासाठी वापरायला कोणाचीही हरकत नाही. यावर्षी रस्त्यांची कामे अद्याप बंद आहेत. रस्ते पुर्ण खराब आहेत तरीसुद्धा आम्ही आज त्याच रस्त्यावरुन ये-जा करुन रिक्षा व्यवसाय करीत आहोत. अन्य विकास कामेसुद्धा ठप्प झाली आहेत. निधी विनाकारण शासनाच्या तिजोरीत पडुन आहे. पाऊस अजुन चालू आहे त्यामुळे आता रस्त्याची कामे, अन्य विकास कामे सुद्धा होणे कठिण आहे. खराब रस्त्यावरुन व्यवसाय करण्याची सवय बरीच वर्षे अंगवळणी पडून गेलेली आहे.
निधीतून मदत झाली तर आम्ही अजुन एक वर्ष खराब रस्त्यावरुन व्यवसाय करण्यास तयार आहोत.
निधी जो सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी आहे तो सिंधुदुर्गातील जनतेच्या हितासाठी वापरुन जनतेला मदत करावी, आज लाईट बिलानी लोकांची कंबरडी मोडली आहेत. त्यासाठी निधी वापरून सिंधुदुर्गातील जनतेला हे पालकमंत्री शिवसेनेचे आहेत आणि जनतेच्या हितासाठी आहेत हे दाखवून देण्याची हि खरी आणि योग्य वेळ आहे.
या निवेदनाचा विचार करुन योग्य निर्णय कराल अशी अपेक्षा अविनाश पाटील यांनी व्यक्त केली आहे.