आमदार दीपक केसरकरांना शल्य…परंतु लोकप्रतिनिधी, पदाधिकारी कार्यरत असतात का?
संपादकीय….
सावंतवाडी मतदारसंघाचे विद्यमान आमदार दीपक केसरकर यांनी “आपण मतदारसंघात निवडून येतो परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मध्ये अपयश येतं अशी “शिवसंपर्क अभियान”च्या वेळी बोलून दाखवलेली खंत मनात बोचत असलेलं शल्य हे विदारक सत्य आहे. दीपक केसरकर सावंतवाडी पालिकेत नगराध्यक्ष असताना आपल्या करिष्म्यावर एकहाती सत्ता खेचून आणायचे. एकवेळ तर दीपक केसरकर या नावावरच १७/० फरकाने विरोधकांचा धुव्वा उडवून पालिका जिंकली होती. दीपक केसरकर एकदा राष्ट्रवादी पक्षाचे, तर दोन वेळा शिवसेनेकडून आमदार म्हणून निर्विवाद निवडून आले. शिवसेनेने त्यांना राज्यमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री करून जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात पक्ष वाढीसाठी संधीही दिली. दीपक केसरकरांनी जिल्ह्यात कोणीही आणला नाही एवढा निधी आणला परंतु जिल्ह्यातील सरकारी अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे विकासाला म्हणावी तशी चालना मिळाली नाही. परिणामी केसरकरांना पक्षाने दुसऱ्यांदा संधी न देता रत्नागिरीचे उदय सामंत यांना मंत्रिपदाची संधी देत जिल्ह्याचे पालकमंत्री पद बहाल केले. जिल्ह्यातील शिवसैनिक उदय सामंत यांच्याकडून मोठी आशा बाळगून होते, जिल्ह्याला तडफदार तरुण नेतृत्व मिळालं त्यामुळे जिल्ह्यात शिवसेना जोमाने वाढेल असेही वाटले होते, परंतु केसरकरांचे हात छाटता छाटता केसरकरांच्या हाती सत्ता असताना शिवसेनेकडे असलेल्या सत्ता देखील या दोन वर्षात शिवसेनेने गमावल्या आणि भाजपाला वाढण्यासाठी रान मोकळे झाले.
सावंतवाडी पालिका शिवसेनेला का गमवावी लागली?
सावंतवाडी शहरातील लोक शांतताप्रिय, सुशिक्षित सुसंस्कृत म्हणून ओळखले जातात. सावंतवाडी मतदारसंघात तिसऱ्यांदा निवडून आलेल्या केसरकरांना शिवसेनेने मंत्रीपदी डावलल्यानंतर सावंतवाडीतील लोकांनी देखील एकवेळ दुसऱ्या पक्षाला संधी द्यावी म्हणून शिवसेनेला नाकारले. प्रत्येकवेळी शहरवासीय केवळ दीपक केसरकर या नावावर केसरकरांनी कोणालाही उभे केले तरी निवडून देत होते. कारण दीपक केसरकर यांनी आमदारकीच्या काळात केला त्यापेक्षाही जास्त सावंतवाडीचा विकास आपल्या नगराध्यक्ष पदाच्या काळात केला. मंत्री असताना त्यांना संपूर्ण राज्याची जबाबदारी असायची त्यामुळे शहराकडे, मतदारसंघाकडे त्यांचा दुर्लक्ष झाला. शहरातील, मतदारसंघातील लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते आदींनी केसरकरांनी केलेले काम लोकांपर्यंत पोचवले नाही, राज्य सरकारच्या योजना घराघरात नेल्या नाहीत, त्यामुळे केसरकर असो वा शिवसेना पक्ष, पक्षाचे, आपल्या आमदार, मंत्र्यांचे काम सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचले नाही. पर्यायाने शिवसेना लोकांच्या मनातून दूर होऊ लागली.
आमदार म्हणून दीपक केसरकर विधानसभा मतदारसंघात निवडून येतात, परंतु स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये अपयश येतं…
कितीवेळा दीपक केसरकर या नावावर लोक निवडून देणार?
कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, शहर, तालुक्यातील पदाधिकारी यांचं कर्तृत्व काय? पक्षाच्या जीवावर कंत्राटे मिळविणे, कमिशन घेणे की गैरधंदे करून पैसा कमविणे? सावंतवाडीत आजही जुनी कार्यकारिणी कार्यरत आहे. त्यापैकी किती कार्यकारिणी सदस्य, पदाधिकारी पक्षासाठी काम करतात? किती लोकप्रतिनिधी लोकांपर्यंत पोचतात? कोण कोण नगरसेवक पाच वर्षात पुन्हा आपल्या मतदारसंघात काय असुविधा आहेत ह्या पहायला जातात? पक्षाचे वरिष्ठ नेते येतात तेव्हा ऐटीत फिरण्यापेक्षा शहरात कितीतरी समस्या आहेत त्या सोडविण्यासाठी घराघरात जा, लोकांशी संपर्क ठेवा, परंतु लोकांसाठी काहीच केलं नाही ते संपर्क कसे ठेवणार? त्यामुळे पाच वर्षांनी नेत्यांच्या मागून फिरणारे लोकप्रतिनिधी लाळ घोटेपणा करून तिकीट मिळवतात परंतु मतदारांशी असहयोग आणि वॉर्डात असलेल्या असुविधा यामुळे लोक त्यांना नाकारतात आणि दोष येतो तो दीपक केसरकर यांच्यावर…!
शहर शिवसेनेला कोण कोण पदाधिकारी आहेत, शहर अध्यक्ष कोण? नगरसेवक कोण हे देखील लोक विसरून गेले आहेत, कारण पदाधिकारी जनसेवक म्हणून काम करताना दिसत नाहीत. आज लोकप्रतिनिधींना वाटते, लोक आपल्यापर्यंत येणार…परंतु या भ्रमात न राहता लोकप्रतिनिधींनी जनतेपर्यंत गेलं पाहिजे, पाच वर्षात एकदा जनतेपर्यंत जाऊन जनता डोक्यावर घेणार नाही तर आपटणार हे त्रिकाल सत्य आहे.
सावंतवाडी तालुक्यात तर एका पुण्याई वर आयुष्यभर जपणूक चालली आहे. तालुक्यातील इतर पदाधिकारी केवळ प्रचाराच्या वेळीच दिसतात, तोपर्यंत कोणीही फिरकताना दिसत नाही. काही गावांचे सरपंच वगळता इतर कोणीही सक्रिय नसतात, त्यामुळे शिवसेना आज सावंतवाडी तालुक्यात मागे पडत चालली आहे. इतर पक्षात एकी आहे, शहर पदाधिकारी असो वा तालुका पदाधिकारी समाजकार्यात वावरताना दिसतात. परंतु शिवसेनेत आज पूर्वीसारखे झोकून देणारे कार्यकर्ते राहिले नाहीत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेकडे आमदार, खासदार, पालकमंत्री सर्व महत्त्वाची पदे आहेत परंतु त्याचा वापर ना लोक सेवेसाठी होत आहे ना पक्षवाढीसाठी होताना दिसत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही वर्षात केसरकरांना बाजूला ठेऊन राजकारण करण्यात येत असल्याचे चित्र दिसत आहे, त्यातून कदाचित केसरकरांचे नुकसान कमीच होणार, कारण *नेता कुठल्याही पक्षात जाउ शकतो…परंतु मतदारांच्या काळजातून दूर गेलेला पक्ष दुसऱ्यांच्या काळजात जागा करू शकत नाही*. टक्केवारीच्या राजकारणात गुरफटलेल्या अनेक नेत्यांना लोकांनी सुद्धा चांगलेच धडे दिले आहेत. भविष्यात गावागावात शिवसेनेकडून संपर्क झाला नाही, लोकसेवा म्हणून कार्य घडलं नाही तर लोक पक्षापासून दुरावतील आणि पुन्हा एकदा नारायण राणे पक्ष सोडून गेल्यानंतर आलेले दिवस यायला वेळ लागणार नाही.
खासदार अनिल देसाई यांनी ज्या गोष्टीवर बोट ठेवलं त्यावर खोलवर विचार होणे आवश्यक आहे …अन्यथा…