*माजी तालुकाध्यक्ष राजेश पाताडे यांचा खोचक सवाल…!*
*कणकवली:*
सिंधुदुर्ग महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून कुडाळ येथे महागाई विरोधात आंदोलन केले. मात्र या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पेक्षा भाजपशी संबंधित असलेल्या महिला वर्गाचा सहभाग जास्त होता. त्यामुळे हे आंदोलन नक्की कोणाचे? आणि कशासाठी? असा खोचक सवाल माजी तालुकाध्यक्ष राजेश पाताडे यांनी उपस्थित केला आहे.
दहा-पंधरा महिलांना घेऊन जिल्हास्तरीय महिलांचे आंदोलन करणे म्हणजे महिला संघटना मजबूत असल्याचे मानावे का? आजच्या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे महिला तालुकाध्यक्ष किती होते?महिला जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी व सदस्य किती? व किती उपस्थित होते? याचा सखोल अभ्यास केल्यास सिंधुदुर्ग जिल्हा महिला संघटना किती मजबूत आहे. याचे उदाहरण म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसने केंद्र सरकारच्या महागाईविरोधात कुडाळ येथे केलेले आंदोलन.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रांतिक स्तरावर काम करणाऱ्या महिला पदाधिकारी आहेत. राज्यस्तरावर महत्त्वाच्या नेत्यांना भेटून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक समस्यांचा पाठपुरावा करताना आम्ही पाहिले आहे, हे चांगलेच आहे. पण ज्या भागाचे आपण नेतृत्व करतो तिथे महिला संघटनेची स्थितीत काय याचा कधी विचार सिंधुदुर्गातील प्रदेश महिला नेत्यांनी विचार केला का? जर केला असता तर आज दहा – पंधरा महिला घेऊन जिल्हास्तरीय आंदोलन करण्याची वेळ महिला जिल्हाध्यक्षांवर आली नसती.असा प्रश्नही पाताडे यांनी उपस्थित केला.
अलीकडच्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्याची सुकन्या व सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष अर्चना घारे यांच्याकडे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, या तीन जिल्ह्याची जबाबदारी पक्षाने दिलेली आहे. त्याच सावंतवाडी मतदार संघामध्ये चांगले काम चालू आहे. अर्चना घारे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा महिला संघटना मजबूत करण्यासाठी जातीनिशी लक्ष देऊन काम केले पाहिजे. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची संघटनात्मक क्षमता त्यांच्यात आहे. त्यांनी त्याचा पुरेपूर वापर करून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिला संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावेत. अशी समस्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांची अपेक्षा आहे. अनेक महिला राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहेत. परंतु त्यांना त्या प्रवाहात आणण्यासाठीही प्रयत्न होणे आवश्यक आहेत. हे प्रयत्न फक्त अर्चनाताई घारेच करू शकतात असा विश्वासही पाताडे यांनी व्यक्त केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात महिला संघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.
पक्षसंघटना प्रवाहापासून दूर असलेल्या महिला भगिनींना पुन्हा पक्षसंघटना प्रक्रियेत आणण्यासाठी प्रयत्न करावेत. अशी अपेक्षा कणकवली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस माजी तालुकाध्यक्ष राजेश पाताडे यांनी व्यक्त केली आहे.