कुडाळ
रिफायनरीला संसदेत कडाडून विरोध करणारे खासदार विनायक राऊत टोलवसुली विरोधी भूमिका सुद्धा तेवढीच प्रखरपणे मांडणार का? असा सवाल मनसे तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी आज येथे उपस्थित केला. दरम्यान भाजप, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी टोल वसुलीला नुसता प्रसिद्धी माध्यमातून विरोध करत गल्लीत गोंधळ करून दिल्लीत मुजरा करण्यापेक्षा महामार्गाबाबत आपल्या नेत्यांकडे खरी वस्तुस्थिती मांडून जाब विचारावा, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. याबाबत श्री. गावडे यांनी प्रसिद्धी पत्रक दिले.
त्यात असे नमूद करण्यात आले आहे की, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली ओसरगाव येथे टोल वसुली करण्याचे आदेश सूचित केले आहेत. यामध्ये ३ महिन्यांसाठी एमडी करीमुनीसा या कंपनीला टोलवसुली करण्यास मंजुरी देण्यात आलेली असून तद्नंतर इतर कंपनीकडे सोपविले जाणार असल्याचे समजते. वास्तविक जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी हायवेची काम अपूर्णावस्थेत असून प्रकल्पग्रस्तांना देखील प्रशासनाने वाऱ्यावर सोडले आहे. कुडाळ तालुक्यात पणदूर, वेताळ बांबर्डे, पावशी,बिबवणे आदि गावांमधील हायवे व सर्व्हिस रोडची कामे अर्थवट असून देखील टोल वसुलीचा घाट नेमका कुणासाठी घातला जातोय. खासदार श्री. राऊतांनी हायवे टोलवसुलीसाठी कुटुंबियांची कंपनी रजिस्टर करत कंत्राट मिळवण्याचा खटाटोप केला होता. अशा बातम्या मीडियातून समोर आल्या होत्या, हा घाट त्यासाठीच घातला जातोय का ? असा सवाल उपस्थित होत आहे. प्रकल्पग्रस्तांना वाऱ्यावर सोडून, कामे अपूर्ण असताना टोलवसुली आड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसाठी मालिद्याचे दुकान उघडले जात आहे. अशी जनभावना आहे.त्यामुळे केंद्रातील भाजप व राज्यातील सत्ताधारी शिवसेनेच्या नेत्यांनी प्रसिद्धी माध्यमातून विरोध दर्शवून गल्लीत गोंधळ करत दिल्लीत मुजरा करण्यापेक्षा आपापल्या वरिष्ठ नेत्यांना टोलवसुलीसाठी घाई गडबड नेमकी का ? व कुणासाठी केली जातेय? याचा जाब विचारण्याची गरज आहे. असेही ते म्हणाले.