You are currently viewing सिंधुदुर्ग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुंदोपसुंदी…

सिंधुदुर्ग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुंदोपसुंदी…

अर्चना घारे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाकडे जिल्हाध्यक्षांसहित समर्थकांची पाठ

कुडाळ येथे गुरुवारी सौ.अर्चना घारे यांच्या नेतृत्वाखाली महागाई विरोधात राष्ट्रवादीने आंदोलन केले होते. कोकण विभागाची महत्त्वाची जबाबदारी वरिष्ठ नेतृत्वाने सोपविल्यानंतर सौ.अर्चना घारे-परब यांनी पक्षवाढीसाठी जिल्हाभरात कामाला सुरुवात केली आहे. केंद्र सरकारच्या महागाईच्या विरोधात त्यांनी गुरुवारी कुडाळ येथे राष्ट्रवादी पक्षातर्फे आंदोलन केले होते. परंतु सौ. अर्चना घारे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात खुद्द राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आणि त्यांचे कट्टर समर्थक कार्यकर्ते, कुडाळ राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष भास्कर परब हे मात्र अनुपस्थित राहिले. जिल्हाध्यक्ष अमित सामंत आणि कुडाळ राष्ट्रवादी तालुकाअध्यक्ष भास्कर परब यांनी आंदोलनाकडे पाठ फिरवल्याने सिंधुदुर्ग राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुंदोपसुंदी असल्याचे चित्र समोर आले आहे. यात कळीचा मुद्दा कोणत्याही पदावर नसलेल्या संदिप राणे यांचा महिला राष्ट्रवादी संघटनेत हस्तक्षेप असल्याचे सांगण्यात येते.
एकीकडे शरद पवारांसारखे ज्येष्ठ नेते उतार वयात पक्ष वाढीसाठी दौरे करतात, राज्यात सत्ता आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतात तर दुसरीकडे पक्षाने ज्यांच्यावर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याची कमान सोपविली ते जिल्हाध्यक्षच पक्षाच्या दुसऱ्या वरिष्ठ नेत्याने केलेल्या आंदोलनाकडे पाठ फिरवतात यावरून पक्ष वाढीपेक्षा नेत्यांना स्वतःचं पद प्रतिष्ठा महत्त्वाची वाटत आहे हेच दिसून येतं. सौ.अर्चना घारे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनात कणकवली येथून अबिद नाईक, सावंतवाडीतून माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले हे मात्र आवर्जून उपस्थित होते. महिला जिल्हाध्यक्षा रेवती राणे यांनी या आंदोलनात सौ. अर्चना घारे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन केले होते.
जिल्हाध्यक्ष अमित सामंत हे ठाण्यातील मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्तीय.सौ. अर्चना घारे या थेट पवार कुटुंबियांशी संबंधित. त्यामुळे जिल्ह्यात त्यांचे नेतृत्व उदयास येत असल्याने प्रस्थापित अस्वस्थ झाल्याचे चित्र कालच्या आंदोलनानंतर पहायला मिळाले.काल राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात शाब्दिक चकमक उडाली, महिला जिल्हा अध्यक्षा रेवती राणे कमालीच्या संतापल्या आणि कार्यालयातून बाहेर पडल्याचे कळते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागे पडलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अलीकडेच वाढत होता किंबहुना वरिष्ठांच्या, हायकामांडच्या आदेशाने सौ. अर्चना घारे पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्नशील असताना, आणि युवा नेत्रुत्व असलेले प्रफुल्ल सुद्रिक युवकांना संघटीत करीत असताना प्रस्थापितांच्या आडमुठ्या धोरणांमुळे अर्चना घारे यांच्यासमोर पेच निर्माण झाला आहे. पक्षात निर्माण होत असलेल्या दुफळीमुळे सिंधुदुर्गात येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकारिणीत बदल होण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा