You are currently viewing आजपासून कोकण किनारी पर्यटनाला ‘ब्रेक’

आजपासून कोकण किनारी पर्यटनाला ‘ब्रेक’

२५ मे ते ३१ ऑगस्टपर्यंत जलक्रीडा व्यवसाय बंद

मालवण

किनारपट्टीवरील साहसी जलक्रीडा व्यवसाय आजपासून म्हणजेच २५ मे ते ३१ ऑगस्टपर्यंत बंद करण्याचे आदेश महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड विभागाने दिले आहेत. त्यामुळे गेली अनेक दिवस सुरू असलेल्या मालवणच्या किनारी पर्यटन हंगामाला आजपासून ‘ब्रेक लागणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे पर्यटन व्यावसायिकांनी आपल्या पर्यटन बोटी आणि इतर साहित्य किनाऱ्यावर घेण्यास सुरुवात केली आहे.

पर्यटन हंगामाच्या सरतेशेवटी तारकर्ली समुद्रात बोट बुडल्याची दुदैवी घटना घडली आणि मालवणच्या पर्यटनाला गालबोट लागले. या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे प्रादेशिक बंदर अधिकारी कॅप्टन सूरज नाईक यांनी मालवण येथे भेट दिली. यादरम्यान पर्यटन बोटींवर लाईफ जॅकेट वापरले जाते का? याची पाहणी केली. याप्रसंगी बंदरनिरीक्षक आर. जे. पाटील, बाळासाहेब कदम हे उपस्थित होते.

कोरोनाची लाट ओसरल्यानंतर मालवणात राज्यभरतील पर्यटकांचा लोंढा दाखल झाला आणि मालवणच्या पर्यटनाला उभारी मिळाली. पर्यटनावर अवलंबून असेलेले अनेक व्यवसाय जोमाने सुरू झाले. गेली अनेक दिवस तारकर्ली, देवबाग, वायरी, दांडी ते सिंधुदुर्ग किल्ला परिसर पर्यटकांनी फुलून गेले होते. मालवण शहरातही पर्यटकांची बाजारपेठेत रेलचेल पाहावयास मिळाली होती. मात्र आजपासून मालवण किनारपट्टीवरील साहसी जलक्रीडा व्यवसाय बंद होणार असल्याने पर्यटन व्यावसायिकांना घरी परतावे लागणार आहे.

२५ मे ते ३१ ऑगस्टपर्यंत हा बंदी कालावधी असल्याने येथील पर्यटनालाही आजपासूनच “ब्रेक,लागणार आहे. बंदी कालावधीत कोणत्याही पर्यटन व्यावसायिकांनी जलक्रीडा व्यवसाय सुरू केल्यास, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल अशा सूचना महाराष्ट्र बंदर विभागाच्या वतीने करण्यात आल्या आहेत.

किनारपट्टीवरील साहसी जलक्रीडा बंदच राहणार : कॅप्टन सूरज नाईक
25 मे ते 31 ऑगस्टपर्यंत साहसी जलक्रीडा प्रकार बंदच राहणार असून, किल्ला प्रवासी वाहतूकदेखील बंद राहणार आहे. किल्ला प्रवासी संघटनेने वातावरणानुसार मुदतवाढ देण्याची मागणी केली असली तरी मुदतवाढ देण्याचे अधिकार हे वरिष्ठ कार्यालयाकडे आहेत. त्यामुळे याबाबत मुबंई येथील महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे अधिकारी निर्णय घेतील.

प्रतिक्रिया व्यक्त करा