राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा – एम.फार्म., एम.बी.ए. अभ्यासक्रमासाठी निवड
सावंतवाडी:
येथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी औषधनिर्माण शास्त्रातील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी राष्ट्रीय स्तरावर घेतल्या जाणाऱ्या नायपर-२०२० परीक्षेत सुयश यश प्राप्त केले आहे. ही प्रवेश परीक्षा नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, मोहाली या स्वायत्त दर्जा असलेल्या संस्थेतर्फे घेण्यात येते.
कॉलेजच्या सिद्धेश गोसावी, संयुजा निकम, प्राजक्ता कशाळीकर, प्रीतम पालकर व अक्षता ठाकुर यांनी हे यश संपादन केले. यापैकी संयुजा निकम, प्राजक्ता कशाळीकर, प्रीतम पालकर व अक्षता ठाकुर यांनी एम. फार्मसी विभागामध्ये अनुक्रमे ९१६, ९९३, ११६७ व १४९८ ही राष्ट्रीय स्तरावरील रँक प्राप्त केली. तसेच सिद्धेश गोसावी व संयुजा निकम यांनी एम.बी.ए. विभागामध्ये यश संपादन करून अनुक्रमे २३४ व ३२० ही राष्ट्रीय स्तराची रँक प्राप्त केली.
नायपर ही औषधनिर्माणशास्त्र शाखेची देशातील अग्रगण्य संस्था असून भारत सरकारद्वारे तिला इन्स्टिटयूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स हा दर्जा बहाल केलेला आहे. देशात नायपरच्या एकूण सात संस्था असून त्या मोहाली, हैदराबाद, अहमदाबाद, कोलकाता, रायबरेली, गुवाहाटी व हाजीपूर येथे स्थित आहेत. औषध संशोधनामध्ये या सर्व संस्था अग्रगण्य असून त्यामध्ये प्रवेश मिळावा हे फार्मसीच्या प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वप्न असते. नायपर परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मेरीट नुसार एम.फार्म., एम.बी ए. या पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश मिळतो.
नायपर तसेच जी-पॅट परीक्षेच्या सरावासाठी भोसले कॉलेजने स्वतंत्र मार्गदर्शन तासिका घेतल्या होत्या. वर्षभर घेतलेल्या विशेष तासिका तसेच परीक्षा, अभ्यासाचे सुनियोजन व विद्यार्थ्यांची मेहनत या मुळेच हे यश प्राप्त झाल्याचे प्राचार्य डॉ. विजय जगताप यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले, प्राचार्य डॉ. विजय जगताप व मार्गदर्शक प्रा.विनोद मुळे यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.