*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री सौ.वैजयंती आपटे यांची अप्रतिम काव्यरचना*
*निळाई*
वृत्त:- *मंजुघोषा*
गोठलेल्या भावनांच्या गंधकोषी
का अवेळी लाट येते आठवांशी
आठवांचे चांदणे शृंगार देती
स्पर्शगंधाची झळाळी साज देती
स्पर्श होतो आठवांचा रोज रात्री
पण तरीही रात्र भासे रिक्त गात्री
चंद्रतारे आसवांच्या सोबतीला
तू नसे हा भार माझ्या पापणीला
स्वप्न फुलते सोबतीचे, वाट विरही
आत उसळे चांदण्यांची हाक देही
आठवांच्या गोंदणांचे वेड मजला
वाहतो क्षण ओघळोनी स्पर्शिलेला
गंध मागू सांग केव्हा मी फुलांना
झेलले तू ऊन माझे ज्या क्षणांना
ही तुझी माझी निळाई एक झाली
कालचीही ना अता मी राहिलेली
*© वैजयंती विंझे आपटे*