जिल्हा माहिती कार्यालयातर्फे पालकमंत्र्यांना प्रसिद्धी अहवाल सादर
सिंधुदुर्गनगरी
शासनाच्या दोन वर्षपूर्ती निमित्ताने माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने जिल्ह्यातील 63 गावांमध्ये शासनाच्या जनकल्याणकारी योजनांचा लोककलांच्या माध्यमातून जागर करण्यात आला होता. याचा प्रसिद्धी अहवाल आज पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर यांना जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी सादर केला.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनाने द्विवर्षपूर्ती निमित्ताने जनकल्याणकारी योजनांचा लोककलांच्या माध्यमातून जिल्ह्यात जागर केला होता. यामध्ये शाहीर कल्पना माळी, चैतन्य महिला विकास मंडळ आणि विश्राम ठाकर आदिवासी कला अंगण चारिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून प्रत्येकी 21 अशा 63 गावांमध्ये शाहिरी, कलापथक आणि कळसुत्री बाहुल्यांच्या पारंपरिक खेळातून या योजना जन सामान्यांपर्यंत पोहचवण्यात आल्या आहेत.
यात प्रामुख्याने महात्मा फुले जन आरोग्य योजना, आरोग्य क्षेत्रात शासनाने केलेली दोन वर्षातील कामे, जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची सुरुवात, मच्छिमारांसह तौक्ते वादळातील आपदग्रस्तांना दिलेली मदत, शिवभोजन थाळीच्या माध्यमातून गोर गरिबांना दिलेला आधार, स्वच्छ महाराष्ट्र, रोजगार निर्मिती, फळझाड लागवड योजना, महात्मा ज्योतिराव फुले कर्ज मुक्ती योजना, एक शेतकरी एक अर्ज महाडिबीटी पोर्टल, पुण्यश्र्लोक अहिल्याबाई होळकर भाजीपाला रोपवाटिका योजना यांचा प्रामुख्याने समावेश होता. या उपक्रमास गावागावातून चांगला प्रतिसाद मिळाला होता. याबाबतचा प्रसिद्धी अहवाल पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, सिंधु-रत्न योजना अध्यक्ष आमदार दीपक केसरकर यांना देण्यात आला. केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे, आमदार अनिकेत तटकरे यांच्याही कार्यालयाकडे हा अहवाल पाठवण्यात आला आहे. आमदार निरंजन डावखरे, आमदार बाळाराम पाटील आणि आमदार वैभव नाईक यांनाही हा अहवाल पाठवण्यात येणार आहे.