इचलकरंजी / प्रतिनिधी
हातकणंगले तालुक्यातील जिल्हा परिषद प्रभाग रचना सदोष तयार केल्याबाबत आ. प्रकाश आवाडे यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीची दखल घेत आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना ९ मे, २०२२ च्या मार्गर्शक सूचनांनुसारच ही प्रारूप प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती आमदार आवाडे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे.
हातकणंगले तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती
मतदारसंघांची रचना करताना तालुक्यातील राजकीय नेतेमंडळींच्या दबावाखाली राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांच्या विरोधात जाऊन प्रभाग प्रारूप नकाशे केले, अशी तक्रार आ. आवाडे यांनी केली होती. त्यांनी दाखल केलेल्या पुराव्यांची दखल घेत आयोगाने मार्गदर्शक सूचनांनुसारच प्रारूप प्रभाग रचना करण्याची दक्षता घ्यावी, असे आदेश दिले.
याबाबत कोल्हापूरचे जिल्हाधिकारी आणि पुणे विभागीय आयुक्त यांना आयोगाने ई-मेलद्वारे हे आदेश लागू केले आहेत. जिल्हाधिकारी व तहसीलदार यांनी मार्गदर्शक सूचनेनुसार प्रभाग प्रारूप नकाशे केले नाहीत तर त्यांच्या विरोधात उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार, तसेच येणाऱ्या अधिवेशनामध्ये जिल्हाधिकारी कोल्हापूर व तहसीलदार हातकणंगले यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव दाखल करणार असल्याचेही आमदार प्रकाश
आवाडे यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.