You are currently viewing बहावा

बहावा

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या सौ.सुस्मिता सुर्वे, रत्नागिरी यांचा अप्रतिम लेख

*बहावा*

त्याला मी पहिल्यांदा कधी पाहिलं आठवत नाही…. पण पाहताक्षणीच तो मला खूपच आवडला होता. त्याचं ते देखणं मनमोहक रूप…त्याची ती सुवर्णकांती….! प्रथमदर्शनीच मी त्याच्या प्रेमात पडले होते! कोणीही प्रेमात पडेल असाच आहे तो….! होय, तोच तो….बहावा…!

आम्ही दोन वर्षांपूर्वी दिल्लीला गेलो असताना रस्त्याच्या दुतर्फा एका रांगेत उभी असलेली बहाव्याची असंख्य पिवळीधम्मक फुलांनी बहरलेली झाडं आणि त्याखाली पडलेला पिवळ्या पाकळ्यांचा सडा असं डोळ्यांचं पारणं फेडणारं विलोभनीय दृश्य याची देही याची डोळां बसमधून जाताना काही क्षण का होईना, अनुभवलं होतं….! अक्षरशः अवाक् होऊन आम्ही ते दृश्य पाहात होतो! आमच्या तोंडातून प्रत्येक वेळी फक्त,’ वा ssss’ हा एकच शब्द उमटत होता. पटकन खाली उतरावं आणि त्या सुंदर दृश्याचा…त्या क्षणांचा साक्षीदार झाल्याचा पुरावा म्हणून एखादातरी फोटो काढावा असं वाटत होतं…. पण ते शक्य नव्हतं….!

वर्षभर कधीही नजरेतही न येणारा पण चैत्राची चाहूल लागताच अगणित फुलांनी बहरलेला… स्वर्णिम आभा ल्यायलेला बहावा नकळतच सर्वांचं लक्ष वेधून घेतो. एरवी निष्कांचन दिसणारा हा बहावा हे असंख्य पुष्पालंकार लेवून कसा राजबिंडा भासतो! ‘कर्णिकार’,’अमलताश’ अशा विविध नावांनी आणि त्याच्या सोनेरी रंगामुळे ‘ गोल्डन शॉवर ट्री’ म्हणूनही ओळखला जातो. तेव्हा अंगभर सुवर्णालंकार ल्यायलेल्या नववधूसारखाच वाटतो हा बहावा!

उन्हाच्या झळांनी सारी धरती शुष्क झालेली असताना हा मात्र कळ्या-फुलांनी लगडलेली असंख्य झुंबरं अंगाखांद्यावर घेऊन मोठ्या दिमाखात उभा असतो. आग ओकणाऱ्या सूर्याचीही त्याला तमा नसते! उलट तो जणू काही सांगत असतो,’ आता मी आलोय ना, आता थोडेच दिवस राहिलेत उकाड्याचे…थोड्याच दिवसांत उन्हाचा हा दाह कमी करायला पाऊस येईल… सारी सृष्टी हिरवीगार होऊन जाईल… पण तेव्हा मी मात्र नसेन! माझी ही सगळी आभूषणं त्यजून मी पुन्हा आपल्या मूळ रूपात जाईन…’खरंच! निसर्गाकडून हा त्यागाचा गुण घ्यावा! तेव्हा सर्वसंगपरित्याग केलेल्या एखाद्या संन्यस्त ऋषीप्रमाणेच भासतो हा बहावा! साऱ्या मोहमायेपासून दूर…! निश्चल… निराकार…! आपल्या वाट्याला आलेलं आयुष्य उद्याची चिंता न करता आनंदाने जगावं हेच जणूकाही सांगत असतो!

फुलांचा बहर संपल्यावर चॉकलेटी रंगाच्या शेंगा झाडावर दिसू लागतात. या शेंगांची पण एक गंमत आहे बरं का! यांच्या आतमध्ये अनेक छोटे छोटे कप्पे ठराविक अंतराने असतात. त्यात चॉकलेटी चिकट असा गर असतो. त्या प्रत्येक कप्प्यात एक-एक बी असते. म्हणजे प्रत्येकीला स्वतंत्र कप्पा! आणि त्यांच्या संरक्षणार्थ तो चिकट पदार्थ! या निसर्गाचीही कमाल वाटते ना? त्याची प्रत्येक रचनाच कशी आखीव रेखीव आणि सुंदर! प्रत्येक गोष्टीतून जेवढा आनंद घेता येईल तेवढा थोडाच! फक्त पाहणाऱ्याची नजर तशी हवी! खरं ना?

या झाडाचे औषधी उपयोगही बरेच आहेत. याची फुले कफ,पित्तनाशक म्हणून उपयोगी आहेत. यांच्या शेंगांचा गर रेचक, जंतुनाशक, वातनाशक आहे. त्वचाविकारांवर याची पाने गुणकारी आहेत. कोरडा खोकला,तापावरही ही पानं उपयोगी आहेत.

असा हा रूपसंपन्न, सर्वगुणसंपन्न बहावा मी जेव्हा जेव्हा पाहाते तेव्हा तेव्हा…

तो पाहताच बहावा
ओठांवर शब्द येती ‘वाहवा!’

अशीच माझी अवस्था होते!
@ सौ. सुस्मिता संजीव सुर्वे
रत्नागिरी

प्रतिक्रिया व्यक्त करा