– जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस
सिंधुदुर्गनगरी
जिल्हा क्रीडा संकुल येथील जलतरण तलावातील पाणी टीसीएल, तुरटी आणि क्लोरिनचा वापर करून स्वच्छ करावा, तसेच तळ ब्रशने घासून स्वच्छ करण्याबाबत तलावाचे ठेकेदार आदित्य जैस्वाल यांना नोटीस देण्यात आली आहे. तसेच जिल्हा क्रीडा संकुल समितीमार्फत जलतरण तलावाच्या दुरुस्तीचे कामही प्रस्तावित असल्याची माहिती, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविली आहे.
या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, जिल्हा क्रीडा संकुल येथील जलतरण तलाव, चालवणे व देखभालीकरिता रत्नागिरी येथील आदित्य रामदुलास जैस्वाल यांच्याशी फेब्रुवारी 2023 पर्यंत करारनामा केला आहे. या करारामध्ये जलतरण तलावातील पाण्याची स्वच्छता करणे, तळ स्वच्छ करणे याची संपूर्ण जबाबदारी कंत्राटदाराची आहे. तरीही कंत्राटदार जलतरण तलावाची स्वच्छता ठेवत नसल्याने तलावाची तात्काळ स्वच्छता करण्यासाठी कंत्राटदारास नोटीस देण्यात आली आहे. तसेच हे काम दि. 21 मे 2022 रोजीपर्यंत करण्याबाबतही नोटिसीमध्ये सांगण्यात आले आहे.
जिल्हा क्रीडा संकुल समितीने संकुलातील बॅडमिंटन हॉलवरील पत्रे दुरुस्तीचा निर्णय घेतला आहे. हे काम सध्या तांत्रिक मान्यतेसाठी अधिक्षक अभियंता, रत्नागिरी यांच्याकडे पाठवण्याची प्रक्रिया सुरु आहे. तसेच 400 मीटरच्या सिंथेटिक धावन मार्गाचा प्रस्तावही तांत्रिक मान्यतेसाठी पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही सर्व कामे जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या खात्यावरील शिल्लक जमा असलेल्या रकमेच्या व्याजाच्या रक्कमेतून प्रस्तावित करण्यात येणार आहेत. तसेच या कामांना जिल्हा क्रीडा संकुल समिती द्वारे मान्यता प्रदान केलेली आहे.