You are currently viewing नगरपालिकेकडून कचरा हटाव मोहिम सुरू …

नगरपालिकेकडून कचरा हटाव मोहिम सुरू …

दोन दिवसात मालवण शहर स्वच्छ करणार; मुख्याधिकारी संतोष जिरगे

मालवण

मालवण शहरात सध्या नगरपालिका प्रशासनाकडून जागोजागीचा कचरा वेळेत उचलला जात नसल्याने अनेक ठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य पसरल्याने याबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर नगरपालिका मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे यांनी शहरात कचरा हटाव मोहीम हाती घेतली असून येत्या दोन दिवसात मालवण शहर स्वच्छ केले जाईल अशी ग्वाही मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी दिली आहे.

मालवण शहरात सध्या कचऱ्याची समस्या गंभीर बनली आहे. अनेक भागात कचऱ्याची गाडी वेळेवर येत नसल्याने तसेच गटारात, रस्त्यावर व इतर ठिकाणी कचरा साचून राहिल्याचे चित्र आहे. या कचऱ्यात ओला कचरा तसेच कुजलेले आंबे यांचा समावेश असल्याने दुर्गंधीही पसरत आहे. दुर्गंधीमुळे आरोग्याचाही प्रश्न निर्माण होत आहे. सध्या पर्यटन हंगाम सुरू असल्याने शहरातील कचऱ्यात आणखी भर पडत असून बंदर जेटी परिसरात देखील कचऱ्याचे मोठे साम्राज्य पसरलेले आहे.

याबाबत नागरिकांमधून नाराजी व्यक्त होऊन आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी दखल घेऊन स्वच्छता यंत्रणा कामाला लावली आहे. नगरपालिकेच्या माध्यमातून शहरात कचरा हटाव मोहीम युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे. मुख्याधिकारी संतोष जिरगे हे स्वच्छता कर्मचाऱ्यांसह स्वतः रस्त्यावर उतरले असून त्यांच्या देखरेखीखाली चार ट्रॅक्टर व चार स्वतंत्र टीम यांच्या माध्यमातून स्वच्छता करण्यात येणार आहे.

शहरात स्वच्छतेचे काम सुरू असून येत्या दोन दिवसात संपूर्ण शहर स्वच्छ केले जाईल, अशी ग्वाही दिली आहे. लोकांनी घराची पावसाळा पूर्व स्वच्छता करताना घरातील कचरा गटारे व इतरत्र टाकला आहे, तरीही नगरपालिका स्वच्छता कर्मचारी साफसफाई करण्याचे काम करत आहेत, असेही श्री. जिरगे यांनी म्हटले आहे. नागरिकांनी माडाची झावळे, झाडांच्या फांद्या तोडून गटारात अथवा रस्त्यावर टाकू नयेत. स्वतःच्या कुंपणात ठेवाव्यात. कचरा, पाणी व स्ट्रीटलाईट याबाबत तक्रार असल्यास ९४०५५७७४३१ या क्रमांकावर तक्रार नोंदवावी. त्याबाबत नगरपालिकेकडून कार्यवाही केली जाईल, असे आवाहन नगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा