संपूर्ण महाराष्ट्रात २० मे रोजी प्रदर्शित होणार ‘विजयी भव’
आजवर राजकारण आणि खेळावर आधारलेले बरेच सिनेमे प्रदर्शित झाले आहेत. काहींमध्ये केवळ खेळ होता, तर काहींमध्ये फक्त राजकारण… आता मात्र एक असा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, ज्यात राजकारण आणि खेळ यांची अचूक सांगड घालण्यात आली आहे. ‘विजयी भव’ हा चित्रपट मागील काही दिवसांपासून रसिकांपासून सिनेसृष्टीपर्यंत सर्वत्र चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘विजयी भव’च्या ट्रेलरनं रसिकांची उत्सुकता शिगेला पोहोचवण्याचं काम केलं आहे. अत्यंत कमी वेळेत ‘विजयी भव’चा ट्रेलर हजारो रसिकांपर्यंत पोहोचला आहे. या चित्रपटात नेमकं काय पहायला मिळणार याची प्रतीक्षा संपली असून, २० मे रोजी ‘विजयी भव’ संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
स्वास्तिक मोशन पिक्चर्स प्रोडक्शनची निर्मिती आणि केनिल एन्टरटेन्मेंटची प्रस्तुती असलेल्या ‘विजयी भव’ या आगामी मराठी चित्रपटाची निर्मिती किर्तन गोर्धनभाई पटेल आणि जगदीश एम. पवार यांनी केली आहे. दिग्दर्शन शैलेश पटेल आणि अतुल सोनार या जोडगोळीनं केलं आहे. आजवर बऱ्याच दिग्दर्शकांनी जोडीच्या रूपात यश मिळवल्यानंतर शैलेश-अतुल ही नवी जोडी ‘विजयी भव’च्या माध्यमातून प्रेक्षकांवर मोहिनी घालणार आहे. चित्रपटाची कथा पळसखेडा गावाभोवती गुंफण्यात आली आहे. या गावात दर पाच वर्षांनी नवीन सरपंचांची निवड करण्यासाठी कबड्डी सामने खेळवले जातात. सरपंचपदासाठी उभ्या असलेल्या ज्या उमेदवाराचा संघ विजयी होतो त्याच्या गळ्यात सरपंचपदाची माळ पडते. राजकारण म्हटलं की डावपेच, कपट, सूडभावना, चित-पट, गनिमी कावे, हेवे-दावे हे आलेच. याच राजकारणाची सांगड कबड्डीसारख्या अस्सल लाल मातीतील खेळाशी घालण्यात आली आहे. खेळातील खिलाडूवृत्ती राजकारणावर विजय मिळवण्यात यशस्वी होते का ते या चित्रपटात पहायला मिळणार आहे. आजच्या काळात बनणाऱ्या चित्रपटांपेक्षा वेगळं कथानक हे ‘विजयी भव’चं प्लस पॅाईंट आहे. कथानकाला साजेशा प्रसंगांची गुंफण आणि प्रसंगानुरूप संवादलेखन काही ठिकाणी प्रेक्षकांना हसवेल, तर काही ठिकाणी अंर्तमुख होऊन विचार करायला लावेल. सुमधूर गीत-संगीत आणि नयनरम्य लोकेशन्सवर करण्यात आलेलं चित्रीकरण हे ‘विजयी भव’चं आणखी एक वैशिष्टय आहे. राजकारणाच्या पटलावर कबड्डीचा डाव सादर करताना अनाहुतपणे उलगडत जाणारे कथानकातील विविध पैलू रसिकांना क्लायमॅक्सपर्यंत खिळवून ठेवतील.
‘विजयी भव’ची कथा जगदीश पवार यांनी लिहिली असून, पटकथालेखन अतुल सोनार यांनी केलं आहे. मुकुंद महाले यांनी अतुल सोनार यांच्यासोबत मिळून संवादलेखन केलं आहे. इंडियन आयडॅाल फेम जगदीश चव्हाण ‘विजयी भव’मध्ये मुख्य भूमिकेत झळकणार असून, त्यानं गाणंही गायलं आहे. त्यामुळं जगदीशची अभिनेता आणि गायक अशी दुहेरी भूमिका प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. यात पूजा जैसवालसोबत जगदीशची जोडी जमली असल्यानं नव्या जोडीच्या केमिस्ट्रीचीही अनुभवायला मिळेल. सोनाली दळवीने यात दामिनीचे पात्र साकारले असून ती यात एका धडाकेबाज भूमिकेत दिसणार आहे. याखेरीज विनायक केतकर, जगदीश पवार, विक्रम मेहता आदी कलाकारही आहेत. डिओपी लालजी बेलदार यांची सिनेमॅटोग्राफी, विक्रांत देव, नॅाडी रसाळ, राम देवन, दीपक तुरी यांची कोरिओग्राफी, धर्मेश चांचडीया यांचं संकलन, स्वप्नील नंगी यांचं पार्श्वसंगीत, विरेंद्र रत्ने यांचं गीतलेखन, कबीर शाक्या यांचं संगीत आणि जगदीश चव्हाण, कविता राम, मंजिमा गोस्वामी, वैशाली माडे, नूरा सिंग आडे, स्वप्नाली चौहान यांच्या सुमधूर आवाजातील गाणी यात आहेत. कॅास्च्युम डिझाईन कश्मीरानं, तर साऊंड डिझाईंनींग हमजा दागीनावाला यांनी केलं आहे. किशोर संगानी आणि सुरेश पाटील प्रोडक्शन मॅनेजर्स आहेत. संपत आणि अश्विन कार्यकारी निर्माते असलेल्या या चित्रपटासाठी फाईट मास्टर परवेझ आणि शहाबुद्दीन यांनी फाईटींग सिक्वेन्स केले आहेत. २० मे रोजी ‘विजयी भव’ संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.