बॅ.नाथ पै शिक्षण संस्था समाज सेवेची एक प्रयोगशाळा: के. मंजूलक्ष्मी
कुडाळ :
“बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था ही समाजसेवेची एक प्रयोगशाळा आहे. जन्माला आलेल्या मुलाचा पहिला श्वास ते मृत्यूशय्येवर असलेल्या एखाद्या व्यक्तीचा शेवटचा श्वास यातील निरंतर सेवा म्हणजे परिचर्या. इतरांच्या वेदना, दुःख समजून घेण्यासाठी त्या प्रकारची आत्मीयता आणि संवेदना ही माणसात उपजतच असावी लागते. परिचर्या क्षेत्र हे फक्त व्यावसायिक क्षेत्र नसून ती सेवाभावी वृत्ती आहे; कारण मृत्यूशी झुंज देणाऱ्या माणसालाही तेवढाच प्रामाणिकपणाने आपल्याला सेवा द्यावी लागते. स्वतःचे अस्तित्व विसरून इतरांचे अस्तित्व जपावे लागते आणि म्हणूनच समाजासाठी परिचारिका हा एक फार मोठा आधारस्तंभ आहे.”असे उद्गार सिंधुदुर्ग जिल्हा जिल्हाधिकारी माननीय के. मंजूलक्ष्मी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात काढले.
१२ मे या जागतिक परिचर्या दिनाचे औचित्य साधून बॅरिस्टर नाथ पै नर्सिंग एज्युकेशन अँड रिसर्च अकॅडमी कुडाळ येथे आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरुन त्या बोलत होत्या. आपल्या पुढील मनोगतात त्या म्हणाल्या-” बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था ही खरोखरीच समाजसेवेची एक आदर्शवत प्रयोगशाळा आहे. आणि सर्वांसाठी आदर्शवत काम ही संस्था करत आहे. मागील दोन वर्षाच्या कोरोना च्या काळात या संस्थेने आणि नर्सिंग विभागाने या जिल्ह्यासाठी केलेले काम वाखाणण्याजोगे आहे.या कार्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा आणि प्रशासन या संस्थेचे नेहमीच ऋणी राहतील अशा शब्दात त्यांनी संस्थेचा गौरव केला. नर्सिंग महाविद्यालयातून पदवी घेतलेले विद्यार्थी सुद्धा आयएस आयपीएस होऊ शकतात. असं सांगत कोर्स ईरा ऑनलाइन प्रकारांमध्ये भाग घेतलेल्या स्पर्धकांचा त्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर कुडाळ तालुका तहसीलदार माननीय श्री. अमोल पाठक ,बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था अध्यक्ष माननीय श्री .उमेश गाळवणकर, बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. आमृता गाळवणकर, बॅरिस्टर नाथ पै कॉलेज ऑफ फिजीओथेरपी प्राचार्य श्री .सुरज शुक्ला ,नर्सिंग कॉलेज उपप्राचार्य सौ .कल्पना भंडारी तसेच प्राध्यापिका सौ. वैशाली ओटवणेकर उपस्थित होत्या. ” “नर्सिंग हा जरी व्यावसायिक अभ्यासक्रम असला तरी हा दृष्टीकोन या संस्थेने बदललेला आहे.
फक्त पैसा हाच केंद्रबिंदू न मानता निरिच्छ सेवाभावी वृत्ती संस्थेने मुलांमध्ये सामाजिक बांधिलकीची भावना निर्माण करून ती जोपासली आणि याचीच प्रचिती कोरोना काळात सर्वांनाच झाली “,असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि कुडाळ तहसीलदार माननीय श्री. अमोल पाठक यांनी केले. या कार्यक्रमा निमित्ताने बोलताना उमेश गाळवणकर म्हणाले “कोरोना काळात लोकांना सेवा पुरविताना विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आणि पालकांनी आमच्या संस्थेवर दाखविलेला विश्वास हाच खरेतर काम करण्यासाठी आम्हास मुख्य प्रेरणास्रोत ठरला आणि याच कालखंडात जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी सन्माननीय के. मंजूलक्ष्मी यांनी कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून माणुसकी हा मुख्य केंद्रबिंदू मानून आई होऊन जिल्ह्याची घेतलेली काळजी आणि प्रसंगानुरूप घेतलेले निर्णय आम्हाला काम करण्यास योग्य दिशा देत होते”.
या प्रसंगी बॅरिस्टर नाथ पै कॉलेज ऑफ फिजीओथेरपी प्राचार्य डॉ. डॉक्टर सुरज शुक्ला यांनी जमलेल्या सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींना जागतिक परिचारिका दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या दिनाचे औचित्य साधून कोरोना कालखंडात बॅरिस्टर नाथ पै नर्सिंग कॉलेजच्या ज्या शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी समाजासाठी भरीव योगदान दिले त्यांचां जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते गौरव पत्र देऊन सन्मान करण्यात आला. नर्सिंग कॉलेजच्या उपप्राचार्या सौ. कल्पना भंडारी यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित पाहुण्यांची ओळख व आजच्या दिवसाचे महत्त्व विद्यार्थी-विद्यार्थिनींना व सर्व उपस्थितांना विशद केले.
तसेच कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा. सौ .वैशाली ओटवणेकर यांनी केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ .सुमन करंगळे तर आभार प्रदर्शन गौतमी माईणकर यांनी केले. बॅरिस्टर नाथ पै महिला महाविद्यालयाचे प्राचार्य श्री .अरुण मर्गज, नर्सिंग प्रा. सौ. शांभवी आजगावकर, पूजा म्हालटकर, रेश्मा कोचरेकर, प्रियांका माळकर, नेहा महाले, तसेच प्रा.प्रथमेश हरमलकर प्रसाद कानडे व सर्व महाविद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या.