– संदेश पारकर यांच्या मागणीची दखल घेत पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी प्रशासनाला निधी उपलब्ध करुन देण्याचे दिले आदेश.
कणकवली तालुक्यात सन २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे कधी नव्हे ते कणकवली शहर गणपती साना, खारेपाटण गाव पंचक्रोशी, जानवली गाव पंचक्रोशी तसेच वागदे गाव परिसरात पुर आला होता. या पुराचे पाणी घुसल्याने शेतीचे, घरांचे, दुकानांचे, हॉटेल्सचे, वाहनांचे व छोट्या मोठ्या व्यावसायिकांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. तसेच या पुरामुळे वागदे व खारेपाटण येथील महामार्ग देखील बंद झालेला होता.
या पुरामुळे या सर्व नदीपात्रात मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला आहे. गेली कित्येक वर्षे साचलेला हा गाळ काढून नदीपात्रे खोल न केलेस पुन्हा यावर्षी देखील पूरस्थिती निर्माण होऊन कणकवली शहर, खारेपाटण, जानवली, वागदे पंचक्रोशीत जिवित व वित्तहानी होण्याची दाट शक्यता आहे. हा गाळ काढल्यास संभाव्य पूरस्थिती नक्कीच नियंत्रणात येणारी आहे.
वर नमुद पूरस्थितीमुळे उदभवणाऱ्या संकटांची दखल घेत संभाव्य पुरस्थितीचा धोका लक्षात घेवुन शिवसेना युवानेते श्री.संदेश पारकर यांनी सिंधुदुर्गचे पालकमंत्री श्री.उदय सामंत व जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांना वर नमुद सर्व नदीपात्रातील गाळ काढण्यासाठी त्वरित निधी उपलब्ध करण्याची मागणी केली. यावेळी श्री.पारकर यांच्यासोबत अँड.हर्षद गावडे उपस्थित होते.
या मागणीची त्वरीत दखल घेत पालकमंत्री श्री.उदय सामंत तसेच जिल्हाधिकारी यांनी अशी गंभीर पूरस्थिती पुन्हा उदभवु नये यासाठी कणकवली शहर गणपती साना, खारेपाटण नदी, जानवली नदी आणि वागदे गडनदी पात्रातील गाळ काढण्यास त्वरीत निधी उपलब्ध करुन देण्याचे आदेश प्रशासनाला दिले.