ग्रामपंचायतीच्या बेजबाबदारपणामुळे ग्रामस्थांचे पाण्यासाठी होतात हाल…
सावंतवाडी
सावंतवाडी तालुक्यातील आरोस ग्रामपंचायतीची नळपाणी योजना गेली कित्येक वर्षे अविरत सुरू आहे. गावात नैसर्गिक पाण्याचे स्रोत व ओहोळ असल्याने पाण्याचा तुटवडा कधीच भासत नाही. परंतु बहुतांश नागरिकांची घरे ही डोंगर उतारावर असल्याने गावात सखल भागात विहिरी, तळी, झर आहेत. परंतु उंचावर घरे असल्याने पाण्यासाठी लोकांना पायपीट करावी लागत होती म्हणून ग्रामपंचायतीने नळपाणी योजना राबविली आणि प्रत्येक घराला एक स्थिर आकार महिन्याकाठी बसविला.
ग्रामपंचायतीच्या नळपाणी योजनेत एक पंप बिघाड झाल्यास नळपाणी योजनेत खंड पडू नये म्हणून दुसरा राखीव पंप देखील घेतलेला आहे. मागच्या वर्ष दीड वर्षांपूर्वी एका पंपात बिघाड झाल्याने दुसरा पंप लावून नळपाणी योजना सुरू होती. परंतु दुसरा पंप देखील गेल्या १४/१५ दिवसांपासून नादुरुस्त झाल्याने व दीड वर्षांपूर्वी बंद पडलेला पंप ग्रामपंचायतीच्या बेजबाबदार पणामुळे दुरुस्ती करून न घेतल्याने आरोस गावातील नळपाणी योजना बंद पडली आहे. प्रशासनाला दीड वर्षात मोटार दुरुस्ती करण्याचं सुचलं नाही की जबाबदारीची जाणीव नाही असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.
गावातील ग्रामपंचायत कार्यालयात विचारणा केली असता ग्रामस्थांना रोजच उद्या सुरू होईल अशी उत्तरे दिली जातात, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये कमालीची नाराजी पसरलेली आहे. गावात विपुल प्रमाणात पाणी साठा असूनही ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. ग्रामपंचायतीने वेळीच दखल घेऊन त्वरित दोन्ही पंप दुरुस्ती करून लोकांचे होणारे हाल थांबवावेत अशी मागणी आरोस ग्रामस्थांकडून होत आहे.