विक्रेत्यांमुळे किंवा अस्ताव्यस्त पार्किंगमुळे वाहतूक कोंडी आणि बेशिस्तपणा नको
कणकवली
कणकवली शहरातील कुठल्याही विक्रेत्याच्या व्यवसायावर आम्हाला लाथ मारायची नाही. कोरोनानंतर सर्वच उद्योग हळूहळू सावरताहेत, त्यामुळे सर्वांचाच व्यवसाय व्हायला हवा. पण व्यवसाय करताना बेशिस्तपणा, विक्रेत्यांमुळे, वाहन पार्किंगमुळे होणारी वाहतूक कोंडी आम्ही खपवून घेणार नाही. शहरातील सर्व्हीस रोडवर दहा मिनिटापेक्षा अधिकवेळ कुठलीही गाडी थांबली तर त्यावर दंडात्मक कारवाई करा असे निर्देश आमदार नीतेश राणे यांनी आज दिले.
शहरातील अस्ताव्यस्त पर्किंग आणि विक्रेत्यांचे सर्व्हीस रस्त्यावर होणारे अतिक्रमण या अनुषंगाने भाजी, फळ विक्रेते, टेम्पो, ट्रक व्यावसायिक, वाहतूक पोलीस आदींची संयुक्त बैठक नगरपंचायतीच्या सभागृहात झाली. यावेळी आमदार नीतेश राणे बोलत होते. या बैठकीला नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, मुख्याधिकारी अवधूत तावडे, वाहतूक पोलीस निरीक्षक अमित यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे, नगरसेवक अभिजित मुसळे, मेघा गांगण, वाहतूक पोलीस चंद्रकांत माने, प्रकाश गवस, कैलास इंपाळ, यांच्यासह भाजी विक्रेते, टेम्पो वाहतूक, रिक्षा चालक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत आमदार नीतेश रणे यांनी शहरात वाहतुकीची, पार्किंगची शिस्त लागायला हवी. शहराचे विद्रूपीकरण होऊ नये यासाठी काही ठोस निर्णय घ्यावे लागतील. त्याअनुषंगाने आजची बैठक घेत असल्याचे स्पष्ट केले. यावर नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी शहरातील भाजी आणि फळ विक्रेत्यांसाठी उड्डाणपुलाखालील जागेत व्यवस्था केली. पण काही भाजी विक्रेते नेमून दिलेल्या ठिकाणी व्यवसाय करत नाहीत. रस्त्यावर व्यवसाय करतात, त्यात वाहने रस्त्यावर पार्किंग केली जातात. त्यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याचे स्पष्ट केले.
भाजी विक्रेत्यांच्यावतीने बोलताना अनिल हळदिवे म्हणाले, भाजी विक्रेते नेमून दिलेल्या ठिकाणी व्यवसाय करायला तयार आहेत. मात्र बाजारपेठेतील काही दुकानदारांनी आपल्या दुकानांच्या पायऱ्यांवर तसेच दुकानासमोरील मोकळ्या जागेत भाजी विक्रेत्यांना व्यवसाय करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे ग्राहक तिकडे जातात. यात उड्डाणपुलाखालील ग्राहक येत नसल्याने येथील विक्रेत्यांना नुकसान सहन करावे लागते. त्यामुळे यावर पर्याय काढा अशी मागणी केली.
आमदार नीतेश राणे यांनी शहरातील दुकानांसमोर एकही भाजी विक्रेता बसता नये यासाठी नगरपंचायतीने कार्यवाही करावी. तसेच सर्व भाजी विक्रेत्यांना एकाच ठिकाणी व्यवसाय करण्यासाठीचे पुन्हा नियोजन करा असे निर्देश नगराध्यक्षांना दिले. तसेच भाजी आणि फळ विक्रेत्यांनी व्यवसाय करताना नियम पाळा कुठेही अस्वच्छता करू नका असे स्पष्ट केले. दरम्यान राष्ट्रीय महामार्ग ते तेलीआळी डीपी रोड या रस्त्यावर दोन्ही ठिकाणी दुकाने थाटली आहेत. त्या सर्व दुकानांवर कारवाई करा. सर्व विक्रेत्यांनी त्यांच्या गाळ्यातच व्यवसाय करावा. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करा असे निर्देश नगरपंचायत प्रशासनाला दिले.