जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार यांचे अप्रतिम काव्यरचना
वारांगना म्हणा हो,की म्हणा आणखी काही
वेश्याच संबोधता ना ? का दिसत नाही आई..
मज हौस का हो आहे लक्तरे अशी दिसावी?
मी मिटून घेते डोळे, लेकरे फक्त जगावी…
वेशीवरी अशी मी,अब्रूस उधळतांना
सारेच सभ्य तुम्ही.. “बघते लपून येतांना…”
मज पाहिले न कोणी? समजाविता मनाला
अब्रूस का हो माझ्या लाविता पहा पणाला ..!
मी गरजवंत आहे, आहे पहा भुकेली
देऊन जन्म गेला, सोडूनी मला अकेली..
तो वासनांध फक्त नाहीच चाड त्यास
मी करूनी मम चिंध्या, लेकरे फक्त ध्यास…
अब्रूस मी विकूनी,खंगते रोज रात्री
का घेत नाही मज पोटात हीच धात्री?…
कोडगी अशी बनुनी,मी शमविते तुम्हाला
बदनाम करूनी कर्म, लज्जा न ये तुम्हाला…?
उलटाच न्याय सारा पापी तुम्ही,मी कुलटा
पापे करून” मुक्त…”? नेहमीच न्याय उलटा ..?
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : ६ मे २०२२
वेळ : सकाळी ११ : ४८