सिंधुदुर्गनगरी
राज्य निवडणूक आयोगाच्या दि. 10 मार्च 2022 रोजी सुरू असलेल्या टप्प्यापासून निवडणुकांची कार्यवाही त्वरित सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार सावंतवाडी, मालवण आणि वेंगुर्ला नगरपरिषद प्रारुप प्रभाग रचनेवर आक्षेप व हरकतीपासून प्रभाग रचनेचा सुधारीत कार्यक्रम जाहिर झाला आहे.
त्यानुसार या तिन्ही नगरपरिषदेच्या प्रारुप प्रभाग रचना आदेशाचा मसुदा रहिवाशांच्या माहितीसाठी व हरकती तसेच सुचना मागवण्याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या sindhudurg.nic.in या संकेतस्थळावर दि. 10 मे 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. तसेच या तिन्ही नगरपरिषदांच्या कार्यालयामध्ये नगरपरिषद क्षेत्रातील लोकांच्या माहितीसाठी कार्यालयीन वेळेत खुली ठेवण्यात आली आहे.
या आदेशाच्या मसुद्यात कोणाची हरकत व सूचना असल्यास त्या संबंधितांचे सकारण लेखी निवेदन संबंधित नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्या नावे शनिवार दि. 14 मे 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत पोहचेल असे पाठवावे. त्यानंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. तसेच निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्राप्त हरकती व सूचनांवर सुनावणी देण्याचे अधिकार जिल्हाधिकारी यांना देण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.