सा.बा. विभागाला निवेदन सादर
कणकवली
फोंडा तिठा ते लोरे फाटा या रस्त्याचे तातडीने नूतनीकरण करण्यात यावे. नूतनीकरण न केल्यास आणि पावसाळ्यात येथे अपघात होऊन जीवितहानी झाल्यास मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा लागेल, असा इशारा माजी जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा विकास नियोजन मंडळाचे माजी सदस्य संजय आग्रे आणि राजू पटेल यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिले.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय शेवाळे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, फोंडा तिठा ते लोरे फाटा पर्यंतचा देवगड-निपाणी रस्ता हा वाहतुकीस अत्यंत खराब झाला अाहे. खड्डेमय रस्त्यामुळे या ठिकाणी यापूर्वी झालेल्या अपघातात जीवितहानी झालेली आहे.
या रस्त्याची पाहणी यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उप अभियंता व शाखा अभियंता उप विभाग कणकवली यांचे मार्फत झालेली आहे. तसेच याची माहिती आपल्याला यापूर्वीच वेळोवेळी देण्यात आलेली आहे. करुळ घाट बंद होता, त्यावेळी अवजड वाहने यामार्गे जात होती. परिणामी सदर रस्ता वाहतुकीस अयोग्य झाला आहे. तसेच येणाऱ्या पावसाळ्यामध्ये वरील रस्त्यावर वाहनांना अपघात होऊन जीवितहानी झाल्यास आपल्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा लागेल. तरी सदर रस्त्याचे नूतनीकरण तातडीने करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.