You are currently viewing सावंतवाडी विधानसभा सावंतवाडीचे युवराज लखमराजे भाजपा कडून लढणार

सावंतवाडी विधानसभा सावंतवाडीचे युवराज लखमराजे भाजपा कडून लढणार

राजकीय विशेष……

सावंतवाडी मतदार संघ हा गेली तीन टर्म माजी मंत्री विद्यमान आमदार दीपक केसरकर यांचा बालेकिल्ला राहिला आहे. सावंतवाडी शहरावर जवळपास पंचवीस वर्षे दीपक केसरकर यांची एक हाती सत्ता होती. आपल्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत कधीही भ्रष्टाचाराचा आरोप न झालेले अगदी मंत्रिपदी असताना देखील आपल्या स्वच्छ कारभारासाठी ओळखले जाणारे दिपक केसरकर सावंतवाडी दोडामार्ग वेंगुर्ला मतदारसंघातून तीन टर्म प्रतिनिधीत्व करत आहेत. पहिली टर्म राष्ट्रवादी पक्षाकडून आमदार म्हणून पूर्ण केली तर दुसऱ्या वेळी शिवसेनेच्या तिकिटावर प्रचंड मताधिक्क्याने निवडून येत राज्यात गृहराज्यमंत्री तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम पाहिले. तिसऱ्या वेळी दहा हजारापेक्षा जास्त मताधिक्क्याने निवडून येत त्यांनी हॅट्रिक केली, परंतु तीन पक्षांचे मिळून बनलेल्या सरकारमध्ये त्यांना मंत्रिपदाने मात्र हुलकावणी दिली. पुढील काही काळात होणाऱ्या सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील निवडणुकीसाठी आज तरी शिवसेनेचा दीपक केसरकर यांच्या व्यतिरिक्त दुसरा चेहरा दिसत नाही. परंतु मागील निवडणुकीत दीपक केसरकर यांच्या विरोधात लढलेले माजी आमदार राजन तेली यांनी सावंतवाडी मध्ये नवी खेळी खेळताना सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांचा माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रिय मंत्री नारायण राणे, विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर आदींच्या उपस्थितीत प्रवेश घडवून आणला आणि सावंतवाडी मतदार संघातील राजकीय समीकरणे बदलून टाकली.
भाजप पक्षांमध्ये जिल्हाध्यक्षांना सर्व अधिकार असतात, त्यामुळे भविष्यातील सावंतवाडी विधानसभेची जागा सावंतवाडीचे युवराज लखमराजे भोसले लढणार हे जवळपास निश्चित आहे. शिवसेनेकडून आमदार दीपक केसरकर तर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी घोषित केल्या प्रमाणे अर्चना घारे परब यादेखील सावंतवाडी विधानसभेसाठी उमेदवार असतील. त्यामुळे भविष्यातील सावंतवाडीची विधानसभेचेची निवडणूक “धडाकेबाज” अशा प्रकारची होण्याची शक्यता वाटत आहे.
सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष सच्चिदानंद उर्फ संजू परब यांनी स्वतःहूनच गेली काही वर्षे सावंतवाडी विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी केलेली होती. विधानसभा निवडणूक लढण्यासाठी गावागावात त्यांनी आपला संपर्क वाढविला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी खासदार नारायण राणे यांचे जेष्ठ सुपुत्र निलेश राणे अत्यंत जवळचे मानले जातात. असं असताना देखील सावंतवाडीचे युवराज लखमराजे भोसले यांचा भाजपा पक्षामध्ये प्रवेश घडवून आणून भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी संजू परब यांना जोरदार धक्का दिला असे कार्यकर्त्यांमध्ये बोलले जाते. यावर कुरघोडी करताना सावंतवाडी येथील राजवाड्याच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर सावंतवाडीचे युवराज लखमराजे भोसले यांच्या भाजप प्रवेशाबद्दल शुभेच्छा देणारा सावंतवाडीतील भाजपच्या माजी नगरसेवकांनी लावलेला तो फलक मात्र बरच काही सांगून गेला. या फलकावर भाजपाच्या उच्चपदस्थ अगदी आम.नितेश राणे पर्यंत सर्व नेत्यांचे छायाचित्र लावण्यात आले आहे, शुभेच्छुक म्हणून माजी नगरसेवक सुधीर आडिवरेकर, परीमल नाईक, उदय नाईक, सौ विर्नोडकर, व युवा कार्यकर्ता गोविंद प्रभू आदींचे छायाचित्र लावण्यात आले आहे. परंतु या फलकावरून माजी नगराध्यक्ष संजू परब, शहराध्यक्ष अजय गोंदावळे, व युवा भाजपा पदाधिकारी बंटी पुरोहित यांचे छायाचित्र मात्र गायब झाल्याचे दिसते. त्यामुळे सावंतवाडी भाजपामध्ये भलीमोठी दरार पडल्याचे दिसून येत आहे.
गेली दोन वर्षे सावंतवाडी नगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाची सत्ता स्थापन झाली, तदनंतर माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी पक्षाची सर्व सूत्रे आपल्या हातात घेत आपल्या विश्वासातील अजय गोंदावळे, बंटी पुरोहित यांच्याकडे पक्षाची महत्त्वाची पदे सोपवली होती. त्यामुळे वेळोवेळी या तिन्ही पदाधिकाऱ्यांकडून सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांच्यावर टीकाटिप्पणी होताना दिसली. परंतु सावंतवाडी शहराच्या विकासासाठी मात्र कोणीही झटताना दिसले नाही. परिणामी सावंतवाडी शहराचा विकास खुंटला गेला आणि शहरवासीय नाराज झाले. सावंतवाडी विकासाची दिवा स्वप्ने दाखवून २४ तास पाणी देणार अशाप्रकारची आश्वासने दिलेली असताना आज सावंतवाडीत काही ठिकाणी काही मिनिटे सुद्धा पाणी येत नाही, अशी गंभीर परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे सावंतवाडीत पक्ष बॅकफूटवर जाण्याची भीती वाटू लागली आहे. कदाचित त्यामळेच भारतीय जनता पक्षाने सावंतवाडी शहरात बिघडत असलेली पक्षाची प्रतिमा सुधारण्यासाठी सावंतवाडी शहरात नवे नेतृत्व म्हणून युवराज लखमराजे भोसले यांना संधी दिली गेली असेल, अशी दाट शक्यता वाटत आहे. मागील विधानसभा निवडणुकीत राजन तेली यांनी कठोर परिश्रम घेऊन निवडणूक जिंकण्याचे शर्तीचे प्रयत्न केले होते. परंतु तरीही त्यांना आमदार दिपक केसरकर यांनी मात दिली होती. त्यावेळी राजन तेली यांच्या काही हितशत्रूंनी त्यांच्याविरोधात काम केल्याचे ही काही जणांकडून खाजगीत बोलले जात होते. सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीनंतर झालेल्या जिल्हाध्यक्ष राजन तेलींच्या पराभवामुळे तेलींनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. परंतु पक्षनेतृत्वाने राजीनामा न स्वीकारता त्यांच्यावरच जिल्ह्याची जबाबदारी सोपविली. त्यामुळे सिंधुदुर्ग भाजपमधील महत्त्वाचे निर्णय घेण्यात राजन तेली कोणतीही कसूर सोडत नाहीत.
भविष्यात सावंतवाडी नगरपालिकेवर भाजपाचा झेंडा फडकविण्यासाठी राजन तेली यांनी आतापासूनच युवराजांचा प्रवेश घडवून आणत प्रयत्न सुरू केल्याचे दिसून येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा