अंमलबजावणी यंत्रणांची बैठक घ्यावी – जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी
सिंधुदुर्गनगरी
जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना वैयक्तिक नळजोडणीव्दारे दरडोई किमान ५५ लिटर प्रतीदिन, गुणवत्ता पूर्ण पाणी पुरवठा करणे हे या जल जीवनचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या योजनेची अंमलबजावणी करणा-या यंत्रणांची बैठक घेऊन प्राधान्याने आणि गतीने कामे मार्गी लावावेत, अशी सूचना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.
केंद्र शासन पुरस्कृत सुरु असलेला राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम जल जीवन मिशनमध्ये समाविष्ट करुन पुनर्ररचना करण्यात आलेला आहे. सन २०२४ पर्यंत ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना ‘हर घर नल से जल’ प्रमाणे पाणी पुरवठा करण्यास शासन कटिबध्द आहे.
जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हा पाणी स्वच्छता समितीची आज बैठक घेण्यात आली. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, वरिष्ठ भूवैज्ञानिक सागर देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर उपस्थित होते. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता तथा सदस्य सचिव संतोष सावर्डेकर यांनी स्वागत करुन विषय वाचन केले. त्याचबरोबर सन २०२२-२३ चा कृती आराखडा समिती समोर ठेवला.
जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी यावेळी अमंलबजावणी करणाऱ्या सर्व यंत्रणांची सोमवारी बैठक घ्यावी. प्राधान्याने आणि गतीने नागरिकांना पाणी पुरवठा देण्याबाबत कार्यवाही करावी. अशा सूचना दिल्या.