14 जून पर्यंत सूचना, हरकती मांडता येणार
सिंधुदुर्ग
ग्रामपंचायत निवडणुकींच्या प्रभाग रचने करिता कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यापूर्वी दोन वेळा जाहीर केलेल्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम ओबीसी आरक्षणाच्या स्थगिती संदर्भातील न्यायालयाच्या आदेशानंतर रद्द करण्यात आला होता. एकदा तर प्रभाग रचनेवर संदर्भात घेतलेल्या हरकतींवर सुनावणी देखील घेण्यात आली होती. मात्र त्यानंतर ओबीसी आरक्षणासंदर्भात न्यायालयाकडून निर्णय आल्यानंतर हा संपूर्ण राबविलेला कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. आता पुन्हा ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीकरिता च्या प्रभाग रचने संदर्भात कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
त्यानुसार तालुकास्तरावर तहसीलदारां मार्फत गुगल अर्थ चे नकाशे 9 मे पर्यंत अंतिम करण्यात येणार आहेत. तलाठी व ग्रामसेवक यांनी संयुक्त स्थळ पाहणी करून प्रभाग पाडणे व सीमा निश्चित करण्याची कार्यपद्धती 13 मे रोजी राबविण्यात येणार आहे. तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली तालुका स्तरीय समितीने प्रारूप प्रभाग रचने ची 19 मे रोजी तपासणी करण्यात येणार आहे. या समितीने प्रारुप प्रभाग रचनेचा प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यते करीता 24 मे रोजी सादर करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकार्यांनी या संदर्भात संक्षिप्त तपासणी करून दुरुस्ती असल्यास त्या करून त्याला 31 मे पर्यंत मान्यता द्यायची आहे. त्यानंतर 3 जून रोजी प्रारूप प्रभाग रचनेला मान्यता देण्यात येणार आहे. प्रारूप प्रभाग रचनेला प्रसिद्धी देऊन तहसीलदार यांच्याकडून सूचना व हरकती मागविण्यासाठी 6 जून रोजी जाहीर सूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 14 जून पर्यंत प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती घेण्याकरिता अंतिम मुदत असणार आहे. प्राप्त झालेल्या सूचना व हरकती सुनावणीसाठी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे 20 जून रोजी सादर करण्यात येणार आहेत. प्राप्त झालेल्या झालेल्या सर्व सूचना व हरकतीवर उपविभागीय अधिकाऱ्यां मार्फत 24 जुन रोजी सुनावणी घेण्यात येणार आहेत. आलेल्या प्रत्येक हरकती व सूचना वर सुनावणीनंतर अभिप्राय नोंदवून अंतिम निर्णयासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे 29 जून रोजी प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. 1 जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रस्ताव अंतिम करून निवडणूक आयोगाकडे मंजुरीकरिता पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिलेल्या अंतिम प्रभाग रचनेला 5 जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्याकडून प्रसिद्धी देण्यात येणार आहे.