इचलकरंजी/प्रतिनिधी –
आपल्या सामाजिक कार्य कर्तृत्वाने एक आदर्श निर्माण केलेल्या आधार संस्थेचा उपक्रम निश्चितच वाखाणण्याजोगा आहे. गोरगरीबांची ईद गोड व्हावी म्हणून आधार परिवाराने आवश्यक साहित्य देऊन त्यांना खर्या अर्थाने आधार दिला आहे. समाजातील एकता, अखंडता कायम टिकून राहण्यासाठी अशा उपक्रमांची आज गरज आहे, असे प्रतिपादन माजी आमदार तथा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी केले. त्याचबरोबर सर्वसामान्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आधार संस्थेने पुढाकार घ्यावा, असेही ते म्हणाले.
सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या आधार बहुउद्देशीय सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा संस्था आणि आधार बैतुलमाल कमिटी यांच्यावतीने रमजान ईद निमित्त गरजू लोकांना खीर मसाला साहित्याचे वाटप माजी आमदार सुरेश हाळवणकर व कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेचे संचालक स्वप्निल आवाडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना श्री. हाळवणकर बोलत होते.
ते म्हणाले, सलग 17 वर्षापासून आधार संस्थेच्यावतीने राबविला जाणारा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. याचप्रमाणे केंद्र व राज्य शासनाच्या आयुष्यमान योजना, इ श्रम योजना अशा योजनांमध्ये समाजातील सर्वच घटकांना सामावून घ्यावे. त्यासाठी आधार च्या माध्यमातून कॅम्प लावून एकही कुटुंब यापासून वंचित राहणार नाही हे पहावे. याकामी तसेच समाजाच्या प्रत्येक प्रश्नाच्या सोडवणूकीसाठी आम्हीही सदैव आपल्या सोबत राहू असे सांगितले.
यावेळी युवा नेते स्वप्निल आवाडे, राष्ट्रवादी काँग्रेस इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष नितीन जांभळे, माजी उपनगराध्यक्ष रणजित जाधव, शिवसेना शहरप्रमुख सयाजी चव्हाण आदींनी मनोगतात आधार संस्थेच्या कार्याचे कौतुक करत असे कार्य घडत राहो, त्यामध्ये आम्हीसुध्दा सर्वतोपरी सहकार्य करु असे सांगितले. आधार संस्थेचे अध्यक्ष तौफिक मुजावर आणि आधार लायब्ररीचे अध्यक्ष मेहबुब मुजावर यांनी संस्था व लायब्ररीच्या कामाचा आढावा घेतला.
स्वागत व प्रास्ताविक परवेझ गैबान यांनी केले. याप्रसंगी धोंडीलाल शिरगांवे, सलीम बागवान, बैतुलमाल कमिटीचे अध्यक्ष लतिफ गैबान, युसूफ तासगांवे, नुरमहंमद बागवान, सौ. साजिदाबानू मुजावर, सौ. बिलकिस मुजावर, शहनाज मोमीन, बद्रेआलम देसाई, सलीम ढालाईत, सलीम म्हालदार, फारुक अत्तार, युसूफ मुल्ला, जकी मुजावर, रफिक मुल्ला, मेहबुब सनदी, इम्तियाज म्हैशाळे, मखदुम जमादार, दिलावर मोमीन, रसुल सय्यद, सैफुल मुजावर, वाजिद तासगांवे, इम्रान तासगांवे आदी उपस्थित होते. आभार हारुण पानारी यांनी मानले. सूत्रसंचालन फरीद मुजावर यांनी केले.