जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री ज्योत्स्ना तानवडे यांचा लेख
गाणाऱ्यांना आणि ऐकणाऱ्यांना मोठा जोश देणारे हे एक नितांत सुंदर स्फूर्तीगीत आहे.कवी राजा बढे यांचे हे गीत ऐकले की,अंगात वेगळाच उत्साह संचारतो.वातावरण भारून जाते.
महाराष्ट्राची थोरवी सांगतच कवी महाराष्ट्राचा जयजयकार करतात. निसर्गाचे भरभरून वरदान लाभलेल्या महाराष्ट्रात रेवा, वरदा,कृष्णा, कोयना, भद्रा, गोदावरी अशा नद्या या एकतेचे प्रतिक आहेत.त्यांचे पाणी एकच आहे आणि सगळीकडे मातीच्या घागरी या एकतेचे पाणी भरतात.आता भीमा नदीच्या काठावरील घोड्यांना महाराष्ट्रातील शिलेदारांनी यमुनेचे पाणी पाजावे म्हणजेच या भूमीच्या शिलेदारांनी पार यमुने पर्यंत राज्याचा,सत्तेचा विस्तार करावा असे कवी सुचवितात.
कवी पुढे म्हणतात, ” आम्हाला (म्हणजेच महाराष्ट्राच्या शिलेदारांना) गडगडणाऱ्या आभाळाची मुळीच भीती वाटत नाही.कारण आम्ही अस्मानी ( नैसर्गिक ) आणि सुलतानी ( परकीय आक्रमणे )अश्या कोणत्याही संकटांना तोंड द्यायला समर्थ आहोत.आमचा राजा शिवाजी ( शिवशंभू राजा ) हा या सह्याद्रीचा सिंह आहे आणि या राजाच्या ‘ महाराष्ट्र माझा ‘ या गर्जनेचा नाद दऱ्याखोऱ्यांतून घुमतो आहे.
काळ्या पाषाणावर कोरलेली लेणी कायम इतिहासाचे संगोपन करतात.त्याप्रमाणे महाराष्ट्राच्या निधड्या छातीच्या शिलेदारांच्या पराक्रमाने इथल्या नागरिकांच्या मनामनात अभिमानाने घर केलेले आहे. या शिलेदारांची कणखर,पोलादी मनगटे जीवावर उदार होऊन देशासाठी जीवघेणी लढाई खेळतात.ही महाराष्ट्राची भूमी दारिद्र्याच्या आगीत होरपळली आहे.कष्टकरी जनतेच्या कपाळावरील घामाने भिजली आहे.देशाच्या गौरवासाठी झिजलेली आहे.या महाराष्ट्राने दिल्लीचेही तख्त प्राणपणाने राखलेले आहे.
असा हा कष्टांची तमा न बाळगणारा, कोणत्याही परिस्थितीत स्वातंत्र्याच्या, स्वराज्याच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असणारा, शूर,लढवय्या असा ‘माझा महाराष्ट्र’ आहे.त्याचा मला खूप अभिमान आहे.म्हणूनच त्याचा जयजयकार प्रत्येकजणच करतो.
कवी राजा बढे यांच्या या गीताला संगीतकार श्रीनिवास खळे यांनी सुंदर,जल्लोषपूर्ण असे संगीत दिलेले आहे.शाहीर साबळे यांच्या पहाडी आवाजातील या गीताने आपल्या भावविश्वात मानाचे स्थान मिळवलेले आहे.
‘महाराष्ट्र दिन’ या गाण्या शिवाय साजरा होऊ शकत नाही एवढी याची लोकप्रियता आहे. महाराष्ट्राने सर्वच क्षेत्रांमध्ये प्रगती केलेली आहे. महाराष्ट्राच्या शौर्याची, पराक्रमाची साक्ष इतिहासाच्या पानापानात भरलेली आहे. निसर्गाचे अमाप लेणे लाभलेल्या महाराष्ट्राने शेतीत खूप यशस्वी प्रयोग केले आहेत. इतरही अनेक क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर आहे. शैक्षणिक, वैज्ञानिक, वैद्यकीय, तंत्रज्ञान, कला अशा अनेक क्षेत्रांमध्ये भरीव कामगिरी करत देशात, परदेशात मानाचे स्थान मिळवले आहे.
‘महा’ म्हणजे महान राज्याचा कवीने अगदी यथोचित शब्दात गौरव केलेला आहे.म्हणूनच आजचा दिन साजरा करताना अभिमानाने म्हणू यात
‘जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा’
ज्योत्स्ना तानवडे.
पुणे.५८