बॅरिस्टर नाथ पै यांच्या स्मारकाचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते भूमिपूजन
सिंधुदुर्गनगरी,
कोकणाच्या विकासाला दिशा देणारे बॅरिस्टर नाथ पै यांचे स्मारक उभे रहावे अशी सिंधुदुर्ग वासियांची इच्छा होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज विकासाचा एक महत्वाचा टप्पा पूर्ण होत आहे. त्याच स्मारकाचे आज भूमिपूजन होत आहे. याचा जिल्हावासियांसह मलाही मनस्वी आनंद होत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.
वेंगुर्ला नगरपरिषद वेंगुर्ला यांच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या बॅरिस्टर नाथ पै समुदाय केंद्राचा भूमिपूजन सोहळा आज वेंगुर्ला कॅम्प येथे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पार पडला. या सोहळ्यास आमदार दीपक केसरकर, वेंगुर्ला तहसिलदार प्रविण लोकरे, आदिती पै, संजय पडते, सचिन वालावलकर व नागरिक उपस्थित होते.
पालकमंत्री पुढे म्हणाले, बॅरिस्टर नाथ पै यांनी देशाला जो विचार दिला त्याच विचाराचे आम्ही सद्या पालन करुन विकास करीत आहोत. बॅरिस्टर नाथ पै यांचे स्मारक अल्पावधीतच पूर्णत्वास येईल.
आमदार दीपक केसरकर यावेळी म्हणाले बॅरिस्टर नाथ पै यांचे स्मारक म्हणून कॅम्युनिटी सेंटरची उभारणी करण्यात येणार आहे. या स्मारकात बॅरिस्टर नाथ पै यांचा जीवनपट ठेवण्यात येणार आहे. हा जीवनपट येणाऱ्या पिढीला दिशादर्शक व प्रेरणादायी ठरेल. हा एक आनंदाचा क्षण असून याठिकाणी वेंगुर्लाच्या सुपूत्राचा गौरव होत आहे. याचा आम्हाला आनंद होत आहे.