सरपंच, ग्रामसेवक, सदस्य, गटविकास अधिकारी जबाबदार असल्याचा थेट आरोप.
मालवण तालुक्यातील काळसे धनगरवाडी ग्रामस्थ गेली १० वर्षे धनगरवाडी साठी पक्का रस्ता व्हावा यासाठी प्रयत्न करत आहेत. दरम्यान अनेक निवेदने , उपोषणे, आणि आंदोलने करूनही त्यांना अपेक्षित न्याय मिळाला नसून त्यांना हवा असलेला रस्ता झालेला नाही. यामुळे त्यांची वारंवार परवड होत असल्याने धनगरवाडीतील ग्रामस्थांनी १ मे २०२२ रोजी महाराष्ट्रदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामूहिक आत्मदहन करणार असल्याचा इशारा ग्रामस्थ सुनिल न्हावू वरक यांनी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी निवेदन देउन दिला आहे.
रस्ता न होण्यास सरपंच, ग्रामसेवक, सदस्य, गटविकास अधिकारी जबाबदार असल्याचा थेट आरोप.
दरम्यान काळसे धनगरवाडी ग्रामस्थांनी दिलेल्या सदर पत्रामध्ये धनगरवाडी रस्ता न होण्यासाठी त्यांचा रस्ता अडवणारे आणि रस्त्यास विरोध करणारे ग्रामस्थ तसेच काळसे सरपंच केशव सावंत , ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, मालवण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जबाबदार असून आमच्या सामूहिक आत्मदहनासही तेच जबाबदार आहेत असा थेट आरोप केलेला आहे.
त्यामुळे आता येत्या महाराष्ट्र दिनी काळसे धनगरवाडी ग्रामस्थ सामूहिक आत्मदहन करणार कि त्यांची रस्त्याची मागणी पूर्ण होणार आणि ज्यांच्यावर आरोप केले आहेत ते सरपंच आणि इतर काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण गावाचे, तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.