*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास म्हणजे सदस्य लेखक कवी हेमंत कुलकर्णी यांची अप्रतिम काव्यरचना*.
*विषय—सयाजी शिंदेः देवराईचा वटवृक्ष*
*निसर्गमानव*
*पादाकुलक(८+८ मात्रा)*
अजरामरता वरदानाने
आजवरी मी बहरबहरलो
सत्यवान वा पांथस्था ते
आश्रय दिधला फळलो फुललो
बेंगालेन्सिस फायकस जाति
संशोधक मज देती नावे
राष्ट्रवृक्ष मज अभिमानाने
मिरवित होती शहरे गावे
फळाफुलांनी पक्षी प्राणी
होती गोळा बांधव सारे
पारंब्यांतुन पुन्हा नव्याने
वृक्षमालिका मी विस्तारे
दोनशेहून अधिकच उमरी
नवतरूण मी पर्यावरणी
विकास कार्ये अडसर ठरता
कूर्हाडीच्या घावे मरणी
सुपुत्र माझा असे सयाजी
शिंदेकुलीन सह्याद्रीचा
कळवळला मम मरणासन्नी
धडपडला मन काये वाचा
उचलून मला नेले त्याने
देवराईत पुन्हा स्थापिले
मी ही रुजता नवजोमाने
सानंदाश्रू त्यास पाहिले
माझ्यासह तो कित्येकांसी
ऋणानुबंधी तनमन भावो
कलावंतही कलासक्तही
*निसर्गमानव* चिरायु होवो!
—हेमंत श्रीपाद कुलकर्णी,
मुलुंड, मुंबई