तळेरेतील सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव यांची माहिती
तळेरे- प्रतिनिधी
मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरण कामकाजामुळे तळेरे येथे निर्माण झालेल्या विविध समस्यांच्या निवारणाबाबत आवश्यक तो पाठपुरावा करून देखील संबंधितांकडून कोणतीच ठोस कार्यवाही होत नसल्याने सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव यांच्या पुढाकारातून तळेरे ग्रामपंचायतीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कोकण विभागीय अधीक्षक अभियंत्यांकडे तक्रार निवेदन सादर केले आहे.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामकाजामुळे तळेरे येथे विविध समस्या निर्माण होऊन त्याचा विपरीत असा परिणाम स्थानिक नागरी जीवन, शेती व व्यापार यांवर होणारा आहे. ही बाब लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव यांनी २१ मुद्यांचा ऍक्शन प्लान स्थानिक नागरिक, ग्रामपंचायत, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण उपविभाग – खारेपाटणचे अधिकारी व संबंधित ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी यांचे समक्ष मांडलेला होता. त्याअनुषंगाने माजी जिल्हा परिषद सभापती (वित्त व बांधकाम) तथा सदस्य रवींद्र उर्फ बाळा जठार व कणकवली पंचायत समितीचे माजी सभापती तथा सदस्य दिलीप तळेकर यांनी विशेष लक्ष घालून संबंधितांना वेळोवेळी आवश्यक त्या सूचना दिलेल्या होत्या. त्याचप्रमाणे तळेरे ग्रामपंचायतीचे सरपंच साक्षी सुर्वे, उपसरपंच दिनेश मुद्रस, माजी उपसरपंच दीपक नांदलस्कर, सदस्य स्वप्नील वनकर, रुपाली भांबुरे, रिया भोगले, संगीता खानविलकर यांनी स्थानिक ग्रामस्थांच्यावतीने संबंधितांविरोधात उपोषण देखील केले होते. या उपोषणाची सांगता शिवसंग्राम पक्षाचे नेते तथा आमदार विनायकराव मेटे यांच्या उपस्थितीत संबंधितांकडून मिळालेल्या लेखी आश्वासनाच्या अंती झालेली होती. परंतु सदर लेखी आश्वासनामध्ये नमूद प्रमाणे संबंधितांकडून आजतागायत कोणतीही ठोस अशी कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे दिलीप तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व राजेश जाधव यांच्या विशेष पुढाकाराने महामार्गाच्या चौपदरीकरण कामकाजाशी संबंधित प्रलंबित समस्यांबाबत तळेरे ग्रामपंचायतीने पुढचे पाऊल उचलले असून त्याअनुषंगाने तळेरे ग्रामपंचायत लिखित तक्रार निवेदन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कोकण विभागीय अधीक्षक अभियंत्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन राजेश जाधव यांनी सादर केले आहे.
कोकण विभागीय अधिक्षक यांना निवेदन देताना तळेरे तील सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव