काळसे येथील अपंगांच्या स्नेहमेळावा संपन्न
मालवण
जिल्हा प्रशासनाच्या वतीने दिव्यांगांचे प्रश्न सोडविण्यासाठी दिव्यांग मेळावा घेऊन शासनाच्या दिव्यांगांसाठीच्या योजना प्रत्येक दिव्यांग बांधवांपर्यंत पोचवण्यासाठी येणाऱ्या काळात निश्चित प्रयत्न करु. तसेच दिव्यांगांना शासकीय दाखले उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन आणि विविध सक्रिय दिव्यांग संस्था यांच्या सहकार्याने विशेष शिबीरे आयोजित केली जातील. दिव्यांग कलाकार कोण असतील तर त्यांनी आपले प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे सादर करावेत. त्यावर तातडीने कार्यवाही करून त्यांना लाभ मिळवून दिला जाईल. असे आश्वासन जिल्हापरिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी काळसे येथे आयोजित दिव्यांग स्नेहमेळाव्यात मार्गदर्शन करताना केले.
राष्ट्रीय अपंग विकास महासंघ शाखा सिंधुदुर्ग , काळसे पंचक्रोशी अपंग सेवा संस्था काळसे , आणि ग्रामपंचायत काळसे यांच्या संयुक्त विद्यमाने काळसे येथे युनियन बॅंक शाखा कुडाळचे निवृत्त शाखाधिकारी संतोष राणे यांच्या अध्यक्षतेखाली अपंग स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राजेंद्र पराडकर उपस्थित होते तसेच यावेळी रुद्रनाद फाऊंडेशनचे अध्यक्ष रुद्रराज राणे, माजी सभापती उदय परब , काळसे सरपंच केशव सावंत , पेंडूर माजी सरपंच संजय नाईक , युनियन बॅंक शाखा वेंगुर्लाचे निवृत्त शाखाधिकारी विजय तुळसकर, सहाय्यक प्रबंधक प्रशांत साऊळ, राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, नूतन जिल्हाध्यक्ष गुरुनाथ सामंत , उपाध्यक्ष संदिप पाटकर ,जिल्हा सचिव तथा काळसे अपंग सेवा संस्थेचे अध्यक्ष विनोद धुरी, माजी सरपंच चंद्रकांत दळवी, भावना मेस्त्री , ग्रामसेवक पी. आर. निकम , रमेश म्हापणकर , दिव्यांग मित्र अनिल पाटील , संदिप धामापूरकर , विनायक चव्हाण , दिव्यांग सखी उर्मिला चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. या मेळाव्यास पंचक्रोशीतील दिव्यांग बांधव भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी दिव्यांग बांधवांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांचा वाढदिवस केक कापून साजरा केला. तसेच सर्व मान्यवरांचा शाल श्रीफळ देउन सत्कार करण्यात आला. आणि वेतोरे येथील मूकबधीर मुलगी हिने पाच वर्षाचा जे डी आर्ट पेंटींगहा कोर्स नॉर्मल विद्यार्थ्यांमधून यशस्वीरित्या पूर्ण करून दिव्यांग विभागामधून राज्यात प्रथम आल्याबद्दल तिचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. त्यानंतर युनियन बॅंक आणि रुद्रनाद फाऊंडेशन यांच्यावतीने उपस्थित दिव्यांगांना भेटवस्तू वाटप करण्यात आल्या. दरम्यान मेळाव्याचे अध्यक्ष संतोष राणे यांनी दिव्यांगांच्या पंखांना बळ देण्यासाठी कार्यरत असणाऱ्या विविध संस्थांच कौतुक करून अशा स्नेहमेळाव्यातुन व्यक्ती , संस्था जोडत जातील आणि मोठी ताकद निर्माण होइल आणि जिल्ह्यातील संस्थांची देशभर ओळख होईल अशी प्रतिक्रिया यावेळी व्यक्त केली.