You are currently viewing जीवनरथ

जीवनरथ

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्राध्यापिका सौ सुमती पवार यांचा अप्रतिम लेख*

 

*जीवनरथ …..*

 

रथ म्हटल्यावर एकदम बालपणातच गेले हो मी ..

हे बालपण सतत मनात रूंजी घालतं नि आठवणींच्या

चौघड्यांचे रेशमी पदर एक एक करून अलगदपणे उलगडत

राहतं. आता खरोखर वाटतं , खरंच खूप सुखाचे होते ते दिवस ! काडीची सत्ता नव्हती , पूर्ण परावलंबी पण आनंदी!

ना पैशाची चिंता होती ना गरज होती. भोकाड पसरलं की

सगळं काही मिळत होते.

 

“ आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे”

 

हं , तर काय म्हणत होते मी , रथा विषयी , आमच्या लहानपणी आमच्या गांवाशेजारी सोनगीर नावाचे गांव

आहे. तिथे एक इतिहास प्रसिद्ध किल्ला ही आहे. नि तिथे

दसऱ्याला रथयात्रा असे. गल्लीतले लोक बैलगाड्या जुंपून

कुटूंबासह यात्रेला जाऊन यात्रेचा आनंद लुटत असत.आठ

दिवस आधीच यात्रेची तयारी सुरू होत असे. मुलांचे ठेवणीतले

नवे कपडे पेटीतून बाहेर निघत. बायकांच्या साड्यांची लगबग

सुरू होई नि मोठ्या दिमाखात नव्या साड्या नेसून हौसेने

बायका पडद्याच्या गाडीत बसून जत्रेला जात व मनपसंत

खरेदी करत. त्यात भांड्याकुड्यांपासून गोडी शेव जिलेबी

पर्यंत सारे असे.

 

 

गल्लीत हे जत्रेचे वारे सुरू होताच माझे आईच्या मागे टुमणे

सुरू व्हायचे..” माले बी जत्राले जानं से”.वास्तविक आमच्या

घरी दोन बैलजोड्या व दोन गाड्या, एक पडद्याची व एक

मालवहातुकीची दररोज शेतात जाणारी अशा दोन गाड्या

होत्या. पण आईला ह्या जत्रा प्रकरणात फारसा रस नसल्यामुळे आमची गाडी कधीही जत्रेला गेल्याचे मला आठवत नाही. त्यामुळे जत्रेला जायचे तर दुसऱ्यांच्या गाडीतूनच ! आणि तेंव्हा ह्या गोष्टी सहजपणे घडत असत.

पण आईची परवानगी तर हवी ना? ती काही लवकर मिळत

नसे. माझा जीव मात्र कासावीस होत असे.आई सहसा मला

एकटीला बाहेर पाठवायला नाखुष असे. त्यामुळे मी पाचवी

सहावीत असतांना शिर्डीची सहल वगळता तिने मला सहलीलाही कुठे जाऊ दिले नाही,एवढी तिची करडी नजर

असे.एकदा मात्र तिने शेजारच्या आजी बरोबर जाण्याची

परवानगी दिली नि मग काय? आमचे गंगेत घोडे न्हाले.

 

 

आजी आजोबा सालदार व मी छकड्यात बसून निघालो. मी

खूप लहान होते त्यामुळे काही ठळक घटनाच आठवतात.

मैदानात झाडाखाली सोडलेल्या बैलगाड्या, हो तेव्हा वहातुकीचे मुख्य साधन बैलगाडीच होते. आम्ही रथ गल्लीत गेलो नि रथ पाहिला …नि खरोखर

डोळ्याचे पारणे फिटले. प्रचंड गर्दी.. दोरखंडाला लटकलेली

मुंग्यांसारखी माणसे, त्यांचा कोलाहल, त्यांच्या देवाच्या नावाच्या गर्जना, अत्यंत भक्तिभावाने भारावलेल्या वातावरणात चेंगराचेंगरी झाली तरी काही वाटत नसे असा

तो भक्तिचा महिमा होता .गर्दीत चुकामुक होण्याची भीती,

त्यामुळे हात पकडूनच आम्ही फिरत होतो. आता ही सगळे

दृश्य मला डोळ्यांसमोर दिसते आहे.आजी आजोबांनी खरेदी

केली. बाजार हिंडलो नि तृप्त मनाने तो सोहळा ह्याची देही

पाहून आम्ही बैलगाडी सोडली होती तिथे आलो. ही यात्रा माझ्या कायम स्मरणात राहिली, तेव्हा मी गेले नसते तर …?

 

 

अशीच यात्रा , बालाजीचा रथ धुळे शहरात ही निघतो. धुळ्याला मामांकडे माझी मोठी भावंडे शिकत होती. धुळे

शहर तेव्हा खूप महान वाटायचे कारण इंग्रजांनी केलेली

त्याची पद्धतशीर अशी रचना व समांतर अशा एक ते सात

गल्ल्या आखिव रेखिव अशा .तिथे बालाजी रथाचे

अजूनही मोठे प्रस्थ आहे व मोठी रथ यात्रा भरते. मामाच

रहात असल्यामुळे मी धुळ्याला मामेभावाबरोबर रथ पहायला

गेले. तेव्हा ही मी खूप लहानच होते, कारण सगळ्या घटना

आठवत नाहीत . एक मात्र मनावर कायमची कोरली गेली

ती प्रचंड चेंगरा चेंगरी, इतकी की आमचे हातपाय खरचटले

होते नि नंतर कितीतरी दिवस ते दुखत होते. आज ही जमाव

डोळ्यांसमोर दिसतो , त्यात सापडलेले आम्ही असहाय

दिसतो नि माझी जत्रेची खोड कायमची मोडल्याचे आठवते!

 

 

मनात विचार येतो, माणसाच्या जीवनरथाला ही इतकी

आनंदाची चाके नसती तर .. हा जीवनरथ किती निरस

वाटेवरून धावला असता नाही ? अहो, हे सण उत्सव यात्रा

परंपरा ह्या घटनांनीच आपले जीवन आनंददायी व समृद्ध

केले आहे. ह्या सण उत्सवांची आतुरतेने आपण वाट पाहतो,

दसऱ्या पासूनच आपल्याला दिवाळीचे वेध लागतात,

पितृपक्ष गणपती नवरात्र अक्षयतृतीया ह्या सगळ्यांच्या

सरबराईत दिवस कसे पाखरांसारखे उडून जातात नि आपण

आश्चर्याने म्हणतो .. बाप रे .. आले नविन वर्ष ?

मंडळी ह्या सर्व छोट्या छोट्या गोष्टींनी आपल्या आयुष्याचा

रथ सजला आहे, नाही तर जगणे किती रूक्ष झाले असते ना?

 

 

एरव्ही हा संसार रथ ओढतांना आलेल्या अडचणी कुणाला

चुकल्या आहेत? त्या मला कशा सोडतील? प्रचंड संघर्ष

करत अवघ्या एकोणावीस वर्षांची , एफ वाय बीए पास

होऊन नाशिकला स्थिरावलेली मी लग्नानंतर घर संसार

सांभाळत, आर्थिक अडचणींना तोंड देत शिक्षण पुर्ण करून

नोकरीला लागले व रथाचे दुसरे चाक ही कमवू लागल्यामुळे

परिस्थितीचे चटके सुसह्य झाले .बाकी मग अडचणी प्रश्न

सगळ्यांचे थोड्याफार फरकाने सारखेच असतात नाही का?

 

 

बरंय् मंडळी..राम राम ..

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

दि : २७ एप्रिल २०२२

वेळ : दुपारी १२ : ४२

प्रतिक्रिया व्यक्त करा