आरोग्य राज्यमंत्री डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांची मनसे शिष्टमंडळाने घेतली भेट
कुडाळ :
आज दिनांक 2 ऑक्टोबर रोजी जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांट च्या उद्घाटना निमित्त जिल्हा दौऱ्यावर आलेले आरोग्य राज्य मंत्री डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर यांची मनसे शिष्टमंडळाने भेट घेऊन जिल्हा रुग्णालयातील विविध समस्यांबाबत निवेदन सादर केले. यामध्ये प्रामुख्याने जिल्ह्या आरोग्य विभागातील कर्मचारी तुटवडा, तज्ञ डॉक्टरांची कमतरता,कायम कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न, कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या व्यथा, कोरोना केंद्रांमधील विविध समस्या आदी विषयांबाबत निवेदन सादर केले.मनसेचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दूरध्वनीवरून या विषयांबाबत मंत्री महोदयांशी संवाद साधत जिल्हा आरोग्य विभागातील समस्यांकडे लक्ष वेधले.यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष दया मेस्त्री, कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, कुडाळ तालूका सचिव राजेश टंगसाळी,अणाव सरपंच नारायण उर्फ आपा मांजरेकर, सचिन मयेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.