कणकवली :
येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयातील इतिहास विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. सोमनाथ दत्तात्रय कदम यांच्या ‘आंबेडकरी चळवळीतील मातंग समाज’ या ग्रंथाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा डॉ बाबासाहेब आंबेडकर सर्वोत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार नुकताच विद्यापीठाच्या संत ज्ञानेश्वर मुख्य सभागृहात प्रदान करण्यात आला.विदयापीठाची शाल, मानपत्र, स्मृतिचिन्ह व पाच हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडीच्या वतीने या वर्षी प्रथमच योगिराज बागुल मुंबई यांच्या ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे दलितेतर सहकारी’ डॉ सोमनाथ कदम यांच्या ‘आंबेडकरी चळवळीतील मातंग समाज’ व डॉ.तूकाराम रोंगटे यांच्या ‘आदीवासींचेही आंबेडकर’ या महत्वपूर्ण ग्रंथांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वोत्कृष्ट ग्रंथ पुरस्कार देण्यात आले.
या प्रसंगी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर,इंडियाना विद्यापीठ अमेरिका येथील अभ्यासक डॉ. केबिन ब्राऊन,ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडी सेंटर चे प्रमुख डॉ. विजय खरे आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. सोमनाथ कदम यांची संशोधनपर एकूण सात पुस्तके प्रसिद्ध असून राज्य शासनाच्या साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे चरित्र साधने समितीचे सदस्य म्हणूनही ते कार्यरत आहेत.
कणकवली महाविद्यालयाच्या गौरवात मानाचा तुरा रोवल्याबद्दल प्रा.सोमनाथ कदम यांचे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भाईसाहेब खोत, चेअरमन पी.डी.कामत,सचिव विजयकुमार वळंजू,विश्वस्त डॉ.राजश्री साळुंखे व अनिल डेगवेकर,सर्व संस्था पदाधिकारी, प्राचार्य डॉ. राजेंद्रकुमार चौगुले,सर्व शिक्षक वृंद, व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले आहे.