जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्राध्यापिका सौ. सुमती पवार यांची अप्रतिम काव्यरचना
अहो पुस्तके पुस्तके जगण्याची आहे शान
काठोकाठ भरले हो फक्त ज्ञान ज्ञान ज्ञान..
करूनी ते सोडतात वेड्यालाही तो शहाणा
नाही लागत हो त्यांना नाही कसला बहाणा …
नेत्र पडताच पहा कसे घेतात खेचून
मोती पेरतात पहा पहा वेचून वेचून …
नाही मागत हो काही देण्याचाच आहे वसा
म्हणतात फक्त दोन घटिका हो बसा ..
असे काही देती दान होई त्रिखंडात कीर्ति
ते तो प्रकांडपंडित जरी छोटी दिसे मुर्ती …
भांडार ते ज्ञानाचे हो नाही आटत ते कधी
कधी महासागर ते कधी उधाण उदधी ..
गाज ज्ञानाची पडते हाती घेताच तयांना
प्रश्न सुटतात सारे कमी होतात यातना..
सग्या सोयऱ्यांच्या पेक्षा किती तरी उपकारी
विद्येने ते भारलेले असतात जड भारी …
कास घरावी बुकांची नको संगत सोबत
त्यांना धरता जवळी कीर्ति होतेच दिगंत ..
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : २३ एप्रिल २०२२
वेळ : रात्री १० : ३८