मधुकर सीताराम भुर्के माध्यमिक विद्यालय मांगवली येथे आज दि. 23 रोजी रोटरी क्लब वैभववाडी च्या वतीने अस्मिता हा किशोरवयीन मुलींसाठी प्रकल्प राबविण्यात आला. किशोरवयीन मुलींना मासिक पाळी संदर्भात माहिती द्यावी त्यांच्या मनातील गैरसमज दूर करावेत यासाठी रोटरीयन सौ सलोनी टक्के रोटेरियन सौ स्नेहल रावराणे यांनी व माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षिका भोसले मॅडम यांनी विध्यार्थ्यांणींशी प्रत्यक्ष चर्चा करून गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. यावेळी रोटरी क्लब ऑफ वैभववाडी चे अध्यक्ष रोटरीयन संतोष टक्के , सचिव रोटेरियन संजय रावराणे, रोटरीयन संजय सावंत, रोटरीयन महेश संसारे, रोटेरियन मुकुंदराव राणे प्रशालेचे मुख्याध्यापक पाटील सर व सहकारी शिक्षक उपस्थित होते.
रोटरी क्लब म्हणजे काय? रोटरी क्लब ची कार्यपद्धती आणि अस्मिता प्रकल्प राबविण्यासाठी मांगवली माध्यमिक विद्यालयाची निवड का केली याचे विस्तृत मार्गदर्शन प्रेसिडेंट संतोष टक्के यांनी केले. त्यावेळी त्यांनी सांगितले की मांगवली माध्यमिक विद्यालयात असलेली शिक्षण पद्धती, संस्था आणि शिक्षक, ग्रामस्थ यांचे शैक्षणिक धोरणाविषयी असलेले सकारात्मक विचार , प्रशालेचे शिक्षक व संस्थाचालक खेड्यापाड्यातल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी घेत असलेल्या अथक प्रयत्नांची माहिती आपल्याला समजली होती. त्यामुळे या माध्यमिक विद्यालया बद्दल रोटरी क्लब ऑफ वैभववाडीला एक विशेष आस्था होती. या आस्ते पोटी विद्यार्थिनींना मासिक पाळी संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आणि त्यांना लागणारे सॅनिटरी पॅड वर्षभर मोफत पुरवण्यासाठी आम्ही या विद्यालयाची निवड केली असल्याचे सांगून यापुढेही रोटरी क्लब च्या वतीने जे काही देता येईल ते या विद्यालयाला देण्याचा आम्ही प्रयत्न करू असे सांगितले.
यावेळी रोटरीयन संजय रावराणे संजय सावंत आणि रोटेरियन महेश संसारे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रशालेचे मुख्याध्यापक पाटीलसर यांनी अत्यंत पोटतिडकीने विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काही देत असाल तर जिथे सांगाल तिथे यायची आमची तयारी आहे आणि जर कुणी देणारा असेल तर त्या ठिकाणी जाण्याची तयारी असल्याचे सांगून रोटरीच्या माध्यमातून खेड्यापाड्यातल्या मुलांसाठी धडपडणाऱ्या आपल्या विद्यालयाला मदत व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
या कार्यक्रमामध्ये मासिक पाळी संदर्भात असणारे गैरसमज किंवा आपले अनेक प्रश्न विद्यार्थिनींनी धाडसाने विचारुन आपले गैरसमज दूर केले . प्रोजेक्टरच्या माध्यमातून मासिक पाळी संदर्भातल्या अनेक बाबी व्हिडिओ द्वारे मुलींना दाखविण्यात आल्या. मुलींच्या सुरक्षिततेसाठी उपयोगी असणाऱ्या स्प्रे चे प्रात्यक्षिक दाखविले गेले. तसेच किशोरवयीन मुलींच्या समस्या आणि त्याची उत्तरे याबाबतची पुस्तके मुलींसाठी देण्यात आली . दर चार महिन्याला पुरतील अशा सॅनिटरी पॅड्स चे वितरण यावेळी मुलींसाठी करण्यात आले. या कार्यक्रमासाठी संस्था मुख्याध्यापक सहकारी शिक्षक, शरद कांबळे यांनी चांगले सहकार्य केल्याबद्दल रोटरी क्लब च्या वतीने आभार मानण्यात आले.